Join us

Paddy Crop : राज्यात पावसाने भात पिकाची दाणादाण, यंदा उत्पादन वाढणार का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 3:39 PM

Paddy Crop : सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे, तर दुसरीकडे भात पट्ट्यात (Rice Crop) परतीच्या पावसाने चांगलेच नुकसान केल्याचे चित्र आहे. 

गोंदिया : धानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात (Gondiya District) यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. निसर्गाने बळीराजाला साथ दिल्याने धान पीक जोमात आले आहे. धान कापणीपर्यंत असेच वातावरण राहिले तर धानाचे हेक्टरी उत्पादन ४० क्विंटलवर जाण्याचा अंदाज कृषी विभागाकडून बांधला जात आहे.  दुसरीकडे भात पट्ट्यात (Rice Crop) परतीच्या पावसाने चांगलेच नुकसान केल्याचे चित्र आहे. सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात जड धानाच्या सुद्धा कापणीला आणि मळणीला सुरुवात होणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकूण पीक लागवड क्षेत्र दोन लाख वीस हजार हेक्टर असून, त्यामध्ये एक लाख ८० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. यंदा सुरुवातीपासूनच धान पिकासाठी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धानाच्या लागवड क्षेत्रात सुद्धा वाढ झाली आहे. ऑगस्टनंतर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस झाल्याने धान पिकासाठी हा ठरला. तर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचे नुकसान होत आहे. सध्या हलक्या प्रजातीचे धान अवस्थेत असून, चांगल्या प्रजातीचे धान पाऊस अनुकूल कापणीच्या सुद्धा पुढील महिन्यात कापणीवर येण्याची शक्यता आहे. 

यंदा बऱ्याच वर्षांनंतर भरपूर पाऊस झाल्याने धानाच्या उत्पादन वाढ होऊन जिल्हा सुजलाम् सुफलाम् होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. दरवर्षी सरासरी हेक्टरी ३० क्विंटलपर्यंत धानाचे उत्पादन होत होते. यंदा ही सरासरी ४० क्विंटलच्या वर जाण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे. अर्थात एकरी १५ क्विंटलपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन होण्याची आशा आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या काही शेताला काही प्रमाणात फटका बसला. 

शासनाच्या वतीने मदत

तर महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. पावसाने सतत हजेरी दिल्यामुळे शेतीमध्ये धान पिकावर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोगांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात असल्याने औषधी खर्चात सुद्धा थोडी घट झाली आहे. काही तालुक्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. धान पिकाला याचा फटका बसू नये म्हणून पिकांवर कीटकनाशक फवारणीचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.

यंदा चार महिन्यांत २०० मिमी अधिक पाऊस गोंदिया जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान चार महिन्यांत सरासरी पाऊस १०५० ते १२५० पडतो. पण यंदा १४५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे २०० मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने भाजीपाला पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, याचा फायदा हा रब्बीतील पिकांना होणार आहे. जिल्ह्यात यंदा एकूण ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये मक्का १८ हेक्टर, तूर ४६८९.६५ हेक्टर, मूग ३.९० हेक्टर, उडीद ०.२४ हेक्टर, इतर कडधान्य १५८.७० हेक्टर, तीळ ७४७.६२ हेक्टर, ऊस १३२२ हेक्टर, कापूस तीन हेक्टर, हळद २४० हेक्टर, आले ७२.८० हेक्टर, पपई ११ हेक्टर, पालेभाज्या ७२२ हेक्टर आणि इतर पिके ३६ हेक्टरवर.

टॅग्स :भातपीक व्यवस्थापनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती