चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur district) धानाचे उत्पादन (Paddy) सर्वाधिक होते. खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र ४ लाख ५८ हजार हेक्टर असून, यापैकी एक लाख ८८ हजार हेक्टरवर (३५ टक्के) भाताचे पीक घेतले जाते. सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने रोवणीला वेग आला. अशातच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी धानाच्या शेतात हजेरी लावली. चिखल तुडवत यांत्रिकी व पारंपरिक पद्धतीने धानाची प्रात्यक्षिक रोवणी केली.
मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भातलागवड (Paddy cultivation) प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर अधिकारी प्रत्यक्ष बांधामध्ये उतरले. त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केली. जिल्हाधिकारी गौडा यांनी यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी, यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पद्धत जाणून घेतली.
यंत्राद्वारे प्रात्यक्षिक करताना जिल्हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्सन
एका दिवसात दोन एकरांत रोवणी
पारंपरिक पद्धतीने भातलागवड केली तर प्रति एकर चार ते साडेचार हजार रुपये रोवणीचा खर्च येतो. मात्र यांत्रिकी पद्धतीने रोवणीत एका दिवसांत दोन एकर रोवणी करता येते. एका एकराला जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मजुरीची बचत होते आणि खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. एका भात रेापाला 45 ते 50 फुटवे निघतात व सदर सुधारीत लागवड पध्दतीमध्ये दोन झाडामधील व दोन ओळीतील अंतर योग्य व एकसारखे असल्याने रोग व किडीचे प्रमाण कमी असते.
रोवणी यंत्रासाठी मिळते ५० टक्के अनुदान
भात रोवणी यंत्राची किमत चार लाख रुपये असून, शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे.
यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी केल्यास योग्य अंतरावर लागवड होते. त्यामुळे पिकास योग्य प्रमाणात हवा, सूर्यप्रकाश मिळतो.
परिणामी भाताचे फुटवे जास्त येतात, बियाणे कमी लागते व उत्पादनात वाढ होते.