Join us

Paddy Farming : धानाच्या शेतीत दशपर्णी अर्काचा यशस्वी प्रयोग, एकरी उत्पादन वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 2:28 PM

Paddy Farming : त्याऐवजी घरच्या गाईचे गोमूत्र व दशपर्णी वनस्पतींचा अर्क यांच्या मिश्रणाची फवारणी धान पिकांवर केली.

Agriculture News : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) भात उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतीत रासायनिक खतांचा वापर टाळला. त्याऐवजी घरच्या गाईचे गोमूत्र व दशपर्णी वनस्पतींचा अर्क यांच्या मिश्रणाची फवारणी धान पिकांवर केली. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून पिके पूर्णतः निरोगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातून उत्पादनातही वाढ झाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. 

निलकंठ अर्जुन गहाणे या युवा शेतकऱ्याचा बिन लागतीचा नैसर्गिक प्रयोग (Paddy Farming) यशस्वी झाला आहे. सावरगाव येथून अगदी सहा किमी अंतरावर असलेले सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव हे त्यांचे गाव आहे. नीलकंठ हे ३७ वर्षीय एक युवा शेतकरी आहेत. त्यांच्याकडे केवळ दोन एकर शेती आहे आणि एक गाय व एक बैलजोडी आहे. ते अगदी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. अलीकडच्या काळात खतांचे वाढलेले भाव, कीटकनाशक, रासायनिक औषधी, गडी माणसांची मजुरी, रोवणी, निंदन, कापणी, मळणी आदी सर्व धान पिकाला लागणारा खर्च वाढत चालला आहे. 

यावर एक उपाय म्हणून कीटकनाशक, रासायनिक औषधीऐवजी बिनखर्चाचा एक प्रयोग एका कलात्मक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात करून पाहिला. घरच्या गाईचे गोमूत्र व दशपर्णी वनस्पतींचा अर्क यांच्या मिश्रणाची फवारणी त्यांनी धान पिकांवर केली. यामुळे पिके पूर्णतः निरोगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडे असलेल्या गाईचे गोमूत्र व कडुलिंब आणि अन्य दहा प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा अर्क याचे मिश्रण करून ते धान पिकावर फवारणी करतात.

एकरी १७ ते १८ पोते उत्पन्न  

धान पिकासाठी एका एकरला जवळपास तीन लिटर गोमूत्र व सहाशे ते आठशे ग्रॅम अर्काचा ते वापर करतात. यामुळे धान पीक पूर्णतः रोगमुक्त होत असल्याचा दावा ते करतात. आणि हा यशस्वी प्रयोग मागील पाच वर्षांपासून ते निरंतर करीत आहेत. यामध्ये त्यांना विषमुक्त असे एकरी १७ ते १८ पोते उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात. त्यांनी महागड्या कीटकनाशक, रासायनिक औषधीऐवजी धान पिकासाठी वापरलेला बिनलागतीचा गोमूत्र व दशपर्णी अर्काचा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अवलंबवावा, असाच आहे.. 

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीचंद्रपूर