Join us

Paddy Farming : पाऊस रुसला, जमिनीत ओलचं नाही, भात लागवड करायची कशी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 5:00 PM

Paddy Farming : एकीकडे जुलै महिन्यात नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असतात, मात्र यंदा वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. 

Paddy Farming : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पश्चिम पट्ट्यात अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने भात लागवड लांबणीवर पडली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), सुरगाणा तालुक्यासह पेठ तालुक्यात जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी त्याच वेळी भात पेरणी (Paddy Sowing) केली होती. शेतकऱ्यांनी लवकर लावणी केली असली तरी पावसाने (Nashik Rain) दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, पेरणी पिकेही धोक्यात आली आहेत. एकीकडे जुलै महिन्यात नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असतात, मात्र यंदा वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. 

पावसाचे आगार असलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती (Rice Farming) केली जाते. ही सर्व भात शेती पाण्यावर अवलंबून असल्याने पेरणीच्या वेळी म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. आता वीस ते २५  दिवसांच्या कालावधींनंतर ही रोपे तरारली आहेत, मात्र मोठ्या पावसाअभावी भात लावणी रखडली आहे. काही शेतकऱ्यांनी सिंचनाच्या पाण्यावर भात पेरणी केली होती. परंतु आता वेळेवर पाऊस नसल्याने भात लावणी कशी होणार या विचाराने शेतकरी चिंतित आहेत.

यंदा मान्सून लवकर दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र तो अंदाज खोटा ठरवत काही भागात पाऊस बरसलाच नाही. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ तालुक्यात अजून पुरेसा पाऊस पडलेला नाही. सुरवातीच्या पावसात शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. ती रोपे आता लावण्याजोगी झाली आहेत; मात्र पाणी नसल्यामुळे भात लावणी रखडली आहे. शेतांमध्ये पाणीच नसल्याने भात रोपांची खणणी, चिखलणी, लावणी ही कामे रखडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे तेथे भात लावणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने व ऊन पडत असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

पेठ तालुक्यात भात-वरई रोपांनी टाकली मानपेठ जुलै महिन्याचा मध्यंतर उजाडला असतानाही अद्याप पाऊस सक्रिय न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना भात, नागली, वरईची लावणी करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या रोपांनी माना टाकल्या आहेत. एकीकडे रोपे तयार असताना पुरेसा पाऊस नसल्याने खाचरात पाणी साचत नाही. पर्यायाने भाताची लागवड खोळंबली आहे. दुसरीकडे नागली व वरईची लावणी उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी दिवसा कडक ऊन पडत असल्याने लावणी केलेली रोपे तग धरतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :भातशेती क्षेत्रनाशिकलागवड, मशागतपाऊस