नाशिक : एकीकडे पावसाने भात पिकाची धूळधाण केल्यानंतर आता उघडीप दिल्याने भात कापणीला (Rice Harvesting) सुरवात झाली आहे. भात कापणीबरोबर भाताची बांधणी केली जाते. त्यानंतर मळणी किंवा काही शेतकरी रचून ठेवतात. आणि त्यानंतर सवडीने मळणी करून घरी आणतात. आता सद्यस्थितीत भात कापणी आणि बांधणी ही दोन मुख्य कामे सुरु आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीतही (Diwali Festival) शेतकरी शेतात असल्याचे चित्र आहे.
नाशिकसह (Nashik) विदर्भ, पुणे, सोलापूर जिल्ह्यात भात लागवड केली जाते. यंदा भात पिकाला (Paddy Farming) पोषक वातावरण होते, मात्र पीक ऐन भरात असताना पावसाने धुमाकूळ घातला. आणि भात शेतीचं झोडपून काढली. अद्यापही अनेक ठिकाणी भात पिके खाली पडलेली आहेत. मात्र पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीसह बांधणीच्या कामाला वेग आला आहे. दुसरीकडे इतरही पिकांची काढणी, शेती कामे सुरु असल्याने कापणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरीचा दरही वाढल्याने एका दिवसाच्या कापणीला दोन-दोन दिवस लागत आहेत.
दुसरीकडे दिवाळी सणाला सुरवात झाल्याने ऐन दिवाळीत भात कापणीला सुरवात झाली आहे. शेतीच्या कामासाठी शोधूनही मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाल्यास त्यांच्या मर्जीनुसार मजुरी द्यावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून भात कापणीसाठी यंत्राचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. मात्र हे यंत्रही अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. परिणामी प्रति एकर लागवडीचा खर्चही वाढलेला आहे.
कापणी आणि बांधणीचा खर्च किती?
सद्यःस्थितीत शेतकरी हलके धान कापणी तसेच बांधणीच्या कामात व्यस्त आहेत. धान कापणीसाठी महिला मजुरांना ३०० ते ३५० रुपये मोजावे लागत आहेत, तर बांधणीसाठी पुरुषांना प्रतिदिन ४०० ते ४५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे भात शेती जर जास्त असेल शेतकऱ्यांना कापणी आणि बांधणीचा खर्च न परवडणारा आहे. त्यातच मजुरांची टंचाई असल्याने अधिक वेळ खर्ची जात आहे.
बियाणे खरेदीपासून ट्रॅक्टरने वखरणी, खते, कीटकनाशके, मळणी आदीसह मजुरांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्या तुलनेत धानाला कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी शेती कसणे कठीण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही धान कापणी व बांधणी मजुरांच्या दरात वाढ झाली आहे. यातही मजुरांना शेतापर्यंत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
- अरुण माहुले, शेतकरी