Pik Pahani : संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम (Rabbi Season) -2024 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. या पीक पाहणीला (E Pik Pahani) लवकरच सुरवात देखील होणार आहे. तत्पूर्वी पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपद्धती नमूद केल्या आहेत. याबाबत नेमकं जाणून घेऊयात...
गाव नमुना बारामध्ये जाहिर केलेल्या पीक पाहणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्ज, हरकत या मंडळ अधिकारी यांनी संबंधित गावाला भेट देऊन योग्य ती चौकशी करून दुरूस्त करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे य सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नियम 30 अनुसार खंड 4 मधील गाव नमूना 12 बाबत सूचना क्र. 2 नुसार करण्यात आली आहे. डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे शंभर टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे.
यानुसार पुढील सुधारीत तरतुदी
गाव नमुना बारामध्ये पिके जाहिर केल्यानंतर जर पीक, क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, पड जमिनीबाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती (गा. न. 12, स्तंभ 2 आणि 4 ते 11) चुकीची जाहिर झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा संबंधित खातेदाराने अशी चूक दुरूस्त करण्यासाठी अर्ज दिल्यास किंवा अशा चुकीबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास....
- ग्राम महसूल अधिकारी हे अर्ज आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करतील.
- मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्ती आवश्यक असल्याची खात्री पटल्यास मंडळ अधिकारी स्थळ निरीक्षण व ऑफलाईन पंचनामा करतील.
- मोबाईल अॅपमध्ये सत्यापनकर्ता लॉगिनने पीक दुरुस्ती करतील.
- सोबतच जमिनीत दुरुस्तीची मागणी केलेली बाब पीक किंवा पडक्षेत्र असल्यास, डिजिटल क्रॉप सर्वे ॲपव्दारे सत्यापनकर्ता लॉगिन मधून फोटो काढून अपलोड करतील आणि शेरा स्तंभात “ ... या कारणास्तव दिनांक../../..रोजी पीक नोंदीत दुरुस्ती केली” असे नमूद करतील.
याप्रमाणे जाहिर केलेल्या चुकीचा संबंधित खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्य योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुराव्यासह सिद्ध झाल्यास, मंडळ अधिकारी या दुरुस्तीची नाव, संबंधित राहाय्य यंत्रणेस तात्काळ कळवतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना पत्राद्वारे कळविले आहे. शिवाय राज्यातही अशी मोहीम राबविण्यात येत आहे.