Join us

Pik Spardha : पीक स्पर्धेत कळवणचा शेतकरी राज्यात प्रथम, शेतकऱ्यास एक लाखांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 9:54 PM

Agriculture News : खरीप हंगाम पीक स्पर्धेत कळवण तालुक्यातील जयपूर येथील पोपटराव गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

नाशिक : राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढवितात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत वेगवेगळ्या पिकासाठी पीक स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत कळवण तालुक्यातील जयपूर येथील पोपटराव गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

खरीप हंगाम (Kharif Season) सन २०२४ पीक स्पर्धेत मूग व उडीद या दोन्ही पिकांच्या गटात राज्यातील आदिवासी गटात कळवण तालुक्यातील जयपूर येथील पोपटराव उखा गायकवाड यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. कृषी विभागाने (Agriculture News) त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला आहे. आदिवासी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तालुक्यातील कृषी विभागाच्या यंत्रणेने त्यांचे अभिनंदन केले. 

पोपटराव गायकवाड यांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच सुनील गायकवाड यांचा उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे यांनी भेट घेऊन सत्कार केला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, मंडळ कृषी अधिकारी रंध्ये, कृषी पर्यवेक्षक आर. के. सावंत, कृषी सहायक नीलम गावित व इतर शेतकरी उपस्थित होते.

११ पिकांसाठी होते स्पर्धा.... कृषी विभागाकडून खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. तालुक्याची उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षिसे देण्यात येतात. राज्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये, दुसरा क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला ४० हजार रुपयेः तर तृतीय क्रमांक विजेत्याला ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येते.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेती