Pik Vima Yojna : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगाम 2023 ची पीकविमा नुकसानभरपाई मिळालेली नाही. केंद्र व राज्य सरकारने 2028 कोटींची प्रीमियम सबसिडी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अद्यापही दिलेली नाही. परिणामी नगर जिल्ह्यातील 12 लाख विमाधारक शेतकऱ्यांना 1162 कोटींची पीकविमा नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा स्वतंत्र भारत पक्षाने टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेल्या चार महिन्यांपासून स्थानिक शेतकरी संघटना पाठपुरावा करत आहेत . पीकविमा कंपनीने खरीप हंगाममधील फक्त सोयाबीन आणि मका पिकांचे नुकसान दावे मान्य केले होते. त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाने खरीप हंगाममधील सर्व पिकांचा नुकसाभरपाईमध्ये समावेश करून भरपाई देण्यात यावी, यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार 20 जून 2024 रोजी झालेल्या बैठकीत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विनायक दीक्षित यांनी खरिपाचे सर्व पिकांना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. यानंतर एक महिना होऊनही काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून पुन्हा 1 ऑगस्ट 2024 रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे टाळे ठोकण्याच आंदोलन केले. तेव्हा ओरिएंटल कंपनीचे दीक्षित यांनी राज्य व केंद्र सरकारकडून 2028 कोटींची सबसिडी तीन आठवड्यात येणे आहे, ती सरकारने विमा कंपनीस जमा केल्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल असे लेखी पत्र दिले .
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विनायक दीक्षित यांचेशी संपर्क केला असता 24 ऑगस्ट रोजी तीन आठवड्यांची मुदत संपूनही सरकारने 2028 कोटी अद्याप दिले नाहीत असे कळविले. त्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने ही रक्कम सरकारकडून देण्यात यावी. यासाठी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी समक्ष भेटून निवेदन दिले. त्याच बरोबर नगर जिल्ह्यातील सर्व 12 आमदार, 2 खासदार यांना रजिस्टर पोस्टाने सदर निवेदन पाठविले आहे.
पुण्यात आंदोलन करणार
आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पीकविमा नुकसानभरपाई न दिल्यास नगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकरी 5 सप्टेंबर 2024 रोजी कृषी आयुक्त कार्यालय , पुणे यांचे कार्यालयाला टाळे ठोकण्याच आंदोलन करणार आहेत असा इशारा स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीकडून देण्यात येत आहे. त्याचसोबत जिल्ह्यातील सर्व आमदार , खासदार,आणि पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जाब विचारला जावा असे आवाहन करण्यात येत आहे