Join us

Pik Vima Yojna : विमा कंपनी म्हणते, 'सरकारकडूनच येणं बाकी, म्हणून शेतकऱ्यांना देणं होत नाही'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 5:22 PM

Pik Vima Yojna : पुण्यातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर 1 ऑगस्ट रोजी टाळे ठोकण्याच आंदोलन करण्यात आले.

Pik Vima Yojna : अहमदनगर जिल्ह्यातील  (Ahmednagar) शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा  (Pik Vima) मिळावा, यासाठी पुण्यातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर 1 ऑगस्ट रोजी टाळे ठोकण्याच आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संबंधित विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी 30 ऑगस्टपर्यंतची मुदत देत सरकारकडून कंपनीला घेणे असल्यामुळे शेतकऱ्यांना देणे देता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.  

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी शासन 2023 24 खरीप व रब्बी हंगाममधील पिक विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने (Pik Vima Company) काढला होता. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळाले नसल्याचे चित्र आहे. तर सरकारने विमा कंपनीला 2028 कोटी रुपये जमा न केल्यामुळे अहमदनगर  जिल्ह्यातील सुमारे 12 लाख शेतकरी 1142 कोटी रुपयांची पीकविमा नुकसानभरपाई पासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शेतकरी संघटनाच्या माध्यमातून 1 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी शेतकऱ्यांना लेखी पत्र दिले असून त्यात त्यांनी सरकारकडून 2028 कोटी रुपये घेणे आहे, परंतु सरकारने अद्याप ते दिलेले नाहीत असे लेखी कळविले आहे.     या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 12 आमदार, 2 खासदार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नगर जिल्ह्यातील 12 लाख विमाधारक शेतकऱ्यांकडून विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी सरकारकडून विमा कंपनीला जी 2028 कोटी रुपयांची रक्कम देणे आहे, ती तत्काळ सरकारला विमा कंपनीकडे जमा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. मगच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मिळवून दिल्याच्या जाहिरातबाजी, पेपरबाजी करावी ही मागणी जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे.                  

स्थानिक लोकप्रतिनिधींना इशारा 

विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी 31 ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पैसे खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. ऑगस्टअखेर पैसे जमा न झाल्यास 3 सप्टेंबर रोजी शेतकरी कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे टाळे ठोकण्याचे आंदोलन करतील, याची दखल घ्यावी. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत याला जबाबदार असलेल्या जिल्ह्यातील सर्व 12 आमदारांना याचा जाब विचारून त्यांचे विरोधी मतदान करतील, याची दखल जिल्ह्यातील सर्व 12 आमदार, 2 खासदार, पालकमंत्री यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्ह्यातील 12 लाख विमाधारक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रकृषी योजनाशेतीमहाराष्ट्र