Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. सन २०२३-२४ च्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत (Pik Vima Yojna) सहभागी झालेल्या पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांची विमा रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. येत्या 31 ऑगस्टपूर्वी ही रक्कम खात्यात जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना राबविली जाते. या द्वारे शेतकरी आपल्या शेताचा पीक विमा काढत असतात. दरम्यान मागील वर्षाच्या खरीप हंगामात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा मुंडे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देय असलेले 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यानंतर कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्या आंदोलनाला यश
पीक विम्याची थकीत रक्कम न दिल्यामुळे मागील आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी नाशिक शहरातील सातपूर आयटीआयजवळील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला होता. शेतकऱ्यांसह संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते. मात्र, कृषी अधिकाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे आंदोलनाचे रूपांतर बैठकीत झाले. त्यानंतर आज मुंडे यांनी थेट पैसे मिळणार असल्याचे आश्वासन दिले.