Pik Vima Yojna : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामातील (Pik Vima Yojna) पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. राज्यभर अनेक वेळा पीक विम्यासाठी आंदोलने झाली मात्र फक्त खोटी आश्वासने देण्यात आली, पैसे मिळाले नाहीत. हा प्रश्न त्वरित सुटावा व शेतकऱ्यांना पीक विम्याची मंजूर रक्कम तातडीने मिळावी, यासाठी गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याचे पैसे (Crop Insurance) अद्याप मिळाले नाहीत. या पार्श्वभूमीवर आज स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्या पासून मोर्चाला सुरुवात झाली. अलंकार टॉकीज, साधू वासवानी चौकमार्गे सेंट्रल बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला. मोर्चा अडवल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कृषी उपायुक्त वैभव तांबे यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारत 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान दीड वर्षापासून शेतकरी पीक विम्याच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सरकार विम्याचे पैसे देण्यास तयार नाही. सत्ताधारी पक्ष हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारने पीक विम्याची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक तो निधी तातडीने विमा कंपन्यांकडे वर्ग करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास, गावात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे अनिल घनवट यांनी दिला.
जाब विचारण्याचे आंदोलन
गेली दीड वर्ष शेतकरी मंजूर पीक विम्याच्या रकमेची वाट पाहत आहेत, आंदोलने करत आहेत, मात्र विमा कंपन्या व सरकारी अधिकारी फक्त खोटी आश्वासने व तारखा देत आहेत. पैसे मात्र देत नाहीत. या दिरंगाईला सरकार जबाबदार आहे. शासनाकडून विमा कंपन्यांना पैसे प्राप्त न झाल्यामुळे पीक विमा थकीत आहे. सरकारने विमा कंपन्यांना पैसे न दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षातील नेते या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. हा प्रश्न त्वरित सुटावा व शेतकऱ्यांना पीक विम्याची मंजूर रक्कम तातडीने मिळावी, यासाठी गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.