Join us

एक झाड लावा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवा, पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 6:46 PM

पर्यावरण संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा येथील ग्रामपंचायतने अनोखे पाऊल टाकले आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा येथील ग्रामपंचायतने अनोखे पाऊल टाकले आहे. वृक्षारोपणाकडे नागरिकांचा कल वाढविण्यासाठी आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करीता या ग्रा. पं. ने नवविवाहितांसाठी एक झाड लावा अन् ग्रामपंचायतकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळावा, असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. असा उपक्रम राबविणारी नानव्हा ग्रामपंचायत ही जिल्ह्यात एकमेव ठरली आहे. 

एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपापयोजना राबविण्यात येत आहेत. यात एक कोटी वृक्ष लागवड असेल किंवा वृक्ष संवर्धनासाठी विविध उपक्रम असतील, या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागातही वाढत चाललेली सिमेंट जंगले, जंगलांचे कमी होत असलेले प्रमाण, प्रदूषणात होत असलेली वाढ आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याची वेळीच दखल घेत गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतणे ही अनोखी संकल्पना राबवली आहे. 

आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायत प्रसिद्ध आहे. याच ग्रामपंचायतने यापूर्वी प्रेमविवाह करण्यासाठी आई-वडिलांचे संमतीपत्र अनिवार्य केले होते. त्यानंतर आता नवविवाहितांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी एक झाड लावा प्रमाणपत्र मिळवा असा उपक्रम सुरू केला आहे. नवविवाहित जोडप्याला विवाहाच्या दाखल्यासाठी एक वृक्ष लागवड करून त्याचा फोटो अपलोड केल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नानव्हा ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे जिल्ह्यावासीयांकडून स्वागत केले जात आहे. नानव्हा प्रमाणे इतरही ग्रामपंचायतींनी पर्यावरण संवर्धनासाठी असाच आदर्श घ्यावा असा सूर उमटत आहे.

नवविवाहितांसाठी सुरू केला उपक्रम 

सध्या विवाहाचे दिवस असून विवाह झाल्यानंतर विवाह प्रमाणपत्र हे काढावेच लागते. अनेक शासकीय कामासाठी विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक झाले आहे. हे विवाह प्रमाणपत्र ग्रामपंचायत अथवा शासकीय कार्यालयातून मिळत असते. याच पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीने गावपरिसरात वृक्ष वाढविण्यासाठी नाव विवाहितांना विवाह प्रमाणपत्रासाठी झाड लावण्याचे अनिवार्य केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीशेतकरीलग्नइनडोअर प्लाण्ट्स