धाराशिव : दिवाळी सणात (Diwali) सोलापूरच्या बाजारात झेंडूच्या (Marigold Farming) फुलाला किलोला शंभर रुपयांच्या जवळपास भाव मिळाला. यामुळे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील तरुण शेतकऱ्याला माळरान जमिनीवर उत्पादित केलेल्या या फुलांच्या माध्यमातून पंधरा दिवसांत साठ हजार रुपयांचे उत्पन्न पदरात पडले आहे.
तुळजापूर तालुक्यातील (Tuljapur) तामलवाडी शिवारात इंद्रजित घोटकर या तरुण शेतकऱ्याने निर्सगाच्या वेगवेगळ्या संकटावर मात करीत १३ ऑगस्ट रोजी १५ गुंठे माळरान जमिनीवर झेंडूच्या ‘पुष्पा प्राइम ऑरेंज’ या जातीच्या अडीच हजार रोपांची लागवड केली होती. यंदा अति पाऊस झाल्याने शेतीला मोठा फटका बसला. पावसामुळे झेंडू फुलांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवला. परंतु, घोटकर यांनी योग्य नियोजन करून लागवड केलेली झेंडूची रोपे जोपासली. यासाठी त्यांनी २० हजार रुपये खर्च केला. पाण्याचे, कीटकनाशक फवारणीचे योग्य नियोजन करीत नवरात्र महोत्सवापासून त्यांनी या फुलांची तोडणी (Zendu Lagvad) सुरू केली.
दरम्यान, दिवाळी सणानिमित्त फुलांची मागणी (Flowers Market) वाढल्याने तसेच शुक्रवारी लक्ष्मीपूजन असल्याने घोटकर यांनी आपली फुले विक्रीसाठी सोलापूरच्या (Solapur Ful Market) बाजारात नेली. तिथे या झेंडूला प्रति किलो ८० ते १०० रुपयांचा भाव मिळाला. यामुळे पंधरा गुंठे जमिनीतून १५ दिवसांत घोटकर यांना साठ हजार रुपयांचे उत्पन्न पदरात पडले. या कामात त्यांना पत्नी आणि मुलांचीही चांगली मदत झाल्याचे घोटकर यांनी सांगितले.
मुंबईतही दरवळला सुगंध
दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथील पारधी वस्तीतील ५० कुटुंबेही तामलवाडी भागात उत्पादित केलेली झेंडूची फुले शेतकऱ्याकडून थेट खरेदी करून ती विक्रीसाठी मुंबई येथे विक्रीसाठी दोन दिवसांपूर्वी घेऊन गेले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून येथील पारधी समाजातील ५० कुटुंबे या भागतील उत्पादित फुले खाजगी वाहनातून घेऊन मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. फुलांची विक्री करून ही कुटुंबे तिथेच दिवाळीही साजरी करतात. या फूल विक्रीतून झालेल्या नफ्यावर मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.