Join us

PM Kisan : 'या' दिवशी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 8:50 PM

पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी रोजी वितरण करण्यात येणार आहे.

PM Kisan : पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेविषयी महत्वाची अपडेट समोर आली असून येत्या 28 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी या दोन्ही योजनांच्या हफ्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असून यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात या हफ्त्यांचे वितरण केले जाणार आहे. राज्यातील जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. अनेक दिवसांपासून या योजेनच्या 16 वा हफ्ता वितरित होणार असल्याची चर्चा होती. अखेर पीएम किसान या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दुसरीकडे राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचेही वितरण देखील याचवेळी होणार आहे. 

१ हजार ९४३ कोटींचे वितरण 

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. 

राज्याचा दुसरा व तिसरा हप्ताही मिळणार 

राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १ हजार ७१२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच दिला आहे. तर दुसरा व तिसरा हप्ता याच समारंभात वितरित केला जाणार आहे. राज्याच्या योजनेमधून सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार ६३८ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनायवतमाळनरेंद्र मोदी