PM Surya Ghar Yojana : देशातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मदत करण्यासाठी सरकार सतत नवीन योजना आणत आहे. यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्य घर योजना (PM Suryaghar Yojana), जी सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत. अशावेळी नेमकी कुठे आणि कशी तक्रार करावी? हे जाणून घेऊयात....
१५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली. देशात सौर ऊर्जेच्या (Solar Panel) वापराला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत, सरकार सौर पॅनेल बसवण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देते. यासोबतच, ही योजना वीज बिल कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय असल्याचे सिद्ध होत आहे.
या योजनेअंतर्गत, सरकार लोकांना त्यांच्या घरात सौर पॅनेल बसवण्यास प्रोत्साहित करते आणि त्यासाठी अनुदान देखील देते. या योजनेत सामील झाल्यावर, दरमहा ३०० युनिट मोफत वीज देखील मिळते, ज्यामुळे घरांमध्ये विजेचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. याशिवाय, सौर पॅनेल बसवल्याने पर्यावरणालाही फायदा होतो, कारण ते एक स्वच्छ आणि हरित ऊर्जा स्रोत आहे.
काय अडचण आहे?
तथापि, या योजनेअंतर्गत अनेक लोकांनी सौर पॅनेल बसवले आहेत परंतु तरीही त्यांना अनुदान मिळालेले नाही. अशा परिस्थितीत लोकांना अडचणी येत आहेत. काही लोकांनी असेही म्हटले की संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊनही सबसिडीचे पैसे त्यांच्या खात्यात आले नाहीत.
अनुदान मिळाले नाही तर काय करावे?
जर तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सौर पॅनेल बसवले असतील, परंतु तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळाला नसेल, तर तुम्ही याबद्दल तक्रार दाखल करू शकता.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा
याबद्दल तुम्ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांक १८००-१८०-३३३३ वर कॉल करू शकता. या योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी हा क्रमांक तुम्हाला मदत करेल.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या
याशिवाय, तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmsgg.in/ ला भेट देऊनही तुमची तक्रार नोंदवू शकता. वेबसाइटवर तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या समस्येचे तपशील आणि सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील.