नाशिक :कांदा निर्यातबंदीनंतर 'नाफेड'ने (NAFED) फेडरेशन कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून सामान्य ग्राहकांना अल्प दरात कांदा विक्री करण्याचे धोरण आखले असताना पिंपळगाव बसवंत येथील मुख्य कार्यालय परिसरात असुविधांचा डोंगर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, येथील कांदा साठवणूक करणाऱ्या गोडावून परिसराला सर्पोद्यानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यासाठी नाफेड अर्थात 'नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया'ने पिंपळगाव बसवंत येथे मुख्य कार्यालय स्थापन केले आहे. याच परिसरात स्वमालकीचे कांदा साठवणुकीसाठी गोडावून व द्राक्ष व डाळिंबासाठी शीतगृह आहे. मात्र, या दोन्ही इमारतींची अत्यंत दयनीय अवस्था आहे. सुरक्षा भिंतींना भगदाड पडले असून, प्रवेशद्वाराचे गेटही मोडकळीला आले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागते. विस्तारित जागेवर गवत वाढले असून, सर्पाचा वावर आहे. केंद्र सरकारची आस्थापना असलेल्या नाफेड कार्यालयाचा परिसर चकाचक असणे गरजेचे असताना या दुरवस्थेची जबाबदारी नेमकी कोणावर आहे, याचे उत्तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे नाही. परिसराला बकाळ स्वरुप प्राप्त झाल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना हे कार्यालय शासकीय नसून पडीक इमारतच आहे, अशी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
भाडेतत्त्वावरील शीतगृहाकडे पाठ
नाफेड कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे शीतगृहाबाबत चौकशी केली असता आम्ही यापूर्वी शीतगृह भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा जाहिरात काढली होती, मात्र, कोणीही प्रतिसाद दिला नाही. परिणामी, दोन वर्षापासून शीतगृह बंदच असल्याचे सांगण्यात आले.
....म्हणे स्वच्छतेसाठी मेंढ्या सोडल्या!
ऑगस्ट 2023 मध्ये पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या आवारात मंडळाचा वावर असल्याचे प्रकार माध्यमातून समोर आला होता. याबाबत येथील एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यावेळी मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपे वाढली होती. हा परिसर स्वच्छ करण्यासाठी गुदाम परिसरात मेंढ्या सोडण्यात आल्याचे उत्तर दिले गेले. तर कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर 12 डिसेंबरपासून 'नाफेडने फेडरेशनमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. या पाच दिवसात 4200 टन कांदा खरेदी करून देशभरात पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.