Agriculture News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील शेतकरी बाप-बेट्याने आपल्या घरातील टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत कमी खर्चात पॉवर टिलरचा जुगाड यशस्वी केला असून या पॉवर टिलरपासून शेतीची वखरणी, फणनी, सऱ्या पाडणे, कोळपणी, बळी नांगर आदी कामे सहजगत्या केली जात आहेत. या जुगाडचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
हडप सावरगावातील प्रगतिशील युवा शेतकरी प्रवीण शशिकांत कोल्हे यांनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून पॉवर विडर, मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) बनविला आहे. त्यासाठी त्यांना त्यांचे वडील शशिकांत कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. सखोल माहिती घेत त्यांनी आपला जुगाड यशस्वी केला आहे. या पॉवर टिलरपासून (Power Tiller) शेतीची वखरणी, फणनी, सऱ्या पाडणे, कोळपणी, बळी नांगर अशी मशागतीची कामे होत आहेत.
दिवसेंदिवस मजुरांची घटती समस्या, जनावरांना सांभाळणे व त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचा विचार प्रवीण व त्यांच्या वडिलांनी केला. शशिकांत कोल्हे यांच्यात लहानपणापासूनच तांत्रिक गोष्टी साकारण्यात अंगभूत क्षमता आहे. यापूर्वीही त्यांनी कांद्याचा ट्रॅक्टर मार्केटला घेऊन गेल्यावर मुक्कामी राहण्याची वेळ येते व रात्री जमिनीवरच झोपावे लागते.
या समस्येवर नामी शक्कल लढवत त्यांनी आपल्या ट्रॉलीच्या पुढील भागात एका व्यक्तीला झोपता येईल असा घडीचा पाळणा तयार केला आहे. आता त्यांनी हा पॉवर टिलर बनवत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या ट्रॅक्टरसाठी त्यांना ३० हजार रुपये खर्च आला आहे. तालुका कृषी अधिकारी येवला तसेच कृषी सहाय्यक हरिभाऊ खोमणे यांनी या जुगाडाची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.