Join us

Chilly Market : यंदा नंदुरबारमध्ये मिरची लागवड वाढणार का? भाव काय मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 2:48 PM

देशातील दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे.

नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो. तसेच देशातील दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. दरवर्षीं मोठ्या प्रमाणावर लाल मिरचीही लागवड करण्यात येते. यंदा देखील शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली असून यंदा मिरची लागवड वाढणार असल्याचे चित्र दिसते. 

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अनेक शेतकरी मिरची लागवडीसाठीशेतीची मशागत करीत असून, यंदा तालुक्यात मागील वर्षापेक्षा मिरची पिकाची लागवड अधिक होण्याची शक्यता आहे. मिरची पिकाच्या लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला असून अत्याधुनिक पद्धतीने लागवड करुन जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान तळोदा तालुक्यात अनेक शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करून ठिबकच्या साहाय्याने मिरची पिकाची लागवड करीत आहेत. हे पीक ११ महिन्यांचे असून, मल्चिंग पेपर, रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर करावा लागतो. मजुरी, निंदणी, कोळपणी आदी मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणावर होतो. मिरची पिकाच्या लागवडीमुळे जमीनही भुसभुशीत राहण्यास मदत होते. बळीराजाला निसर्गाची साथ व मिरचीला दर जर समाधानकारक राहिला, तर हे पीक परवडते, असे बोरद येथील शेतकरी राहुल बन्सी पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सांगितले.

मागील वर्षी तळोदा तालुक्यात 400 हेक्टर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड करण्यात आली होती. परंतु यावर्षी 1 मेपासूनच तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड सुरू केली आहे. काही शेतकरी मात्र पाऊस पडल्यानंतर लागवड करणार आहेत. त्यामुळे बोरद व मोड परिसरात मिरची पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होईल. 

- मीनाक्षी वळवी, तालुका कृषी अधिकारी, तळोदा

असे आहेत लाल मिरचीचे दर 

आज अकोला बाजार समितीत सरासरी 22 हजार रुपये, धुळे बाजारात हायब्रीड मिरचीला 14 हजार रुपये, गडचिरोली बाजारात 16 हजार रुपये, मुंबई     बाजारात लोकल मिरचीला 32 हजार 500 रुपये, नागपूर बाजार समितीत 11500 रुपये तर नंदुरबार बाजार समितीत 5199 रुपये दर मिळाला. 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रनंदुरबारमिरची