Nashik : आज नाशिक तालुक्यातील (Nashik District) भगुर येथे कृषि विभागामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत भरडधान्य कार्यक्रमांतर्गत मका पिकाची (Maize Crop) महिलांची शेतीशाळा आयोजीत करण्यात आली. शेतीशाळा वर्गाची प्रस्तावना भगुरच्या कृषि सहाय्यक जयश्री कुवर यांनी केली. यावेळी मका पिकावरील कीड रोग नियंत्रणासह इतर बाबींची माहिती देण्यात आली.
सदरच्या शेतीशाळा वर्गास नाशिक तालुका कृषि अधिकारी बी. जी. पाटील यांनी मका पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तसेच पिकावरील किड व रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी, नाशिक - १ डी. बी. भामरे यांनी शत्रुकिड, मित्रकिड तसेच रासायनिक औषधे फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि रासायनिक औषधांचा मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
एकात्मिक किड व्यवस्थापन आणि डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान याविषयी तालुका कृषि अधिकारी बी. जी. पाटील यांनी माहिती देवून S 9 कल्चर चा डेपो लावणे आणि दशपर्णी अर्क तयार करणे याचे - प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच कृषि पर्यवेक्षक संजय भांड यांनी पिकविम्याचे महत्त्व पटवून देवून सर्वांनी पिकाचा विमा काढण्यासंबंधी आवाहन केले. यावेळी सदरच्या महिला शेतीशाळा वर्गास पुष्पलता करंजकर, गीता करंजकर, सविता करंजकर, वर्षा करंजकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कृषि सहाय्यक लहवित मोहिनी चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.
लष्करी अळी काय करते....
मका पिकावर लष्करी अळी ही प्रमुख कीड असून या कीडीमुळे मका पिकाचे ४० ते ५० टक्के नुकसान होते. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते. वातावरणातील बदल आणि ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असतो. पहिल्या अवस्थेतील अळ्या पानांचा पृष्ठभाग खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पारदर्शक पांढऱ्या रंगाचे चट्टे पडतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानांना छिद्र पाडतात व पोग्यात शिरून छिद्र करतात. त्यामुळे पोग्यातून बाहेर आलेल्या पानांना एका रेषेत छिद्र दिसतात. या अळीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पानांच्या शिरा व खोडच शिल्लक राहते.
लष्करी अळी नियंत्रणासाठी पुढील बातमी वाचा....
Lashkari Ali : मका पिकावरील नवीन लष्करी अळीचे असे करा नियंत्रण, जाणून घ्या सविस्तर