अकोला : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी भविष्यात चाराटंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्यातील चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजितबकुंभार यांनी रोजी दिला.
यंदा पाऊस कमी झाल्याने पिकांना फटका बसला आहे. शिवाय चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभरात चाऱ्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने उन्हाळ्यात जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये याकरिता जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केला आहे. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा मनाई आदेश अमलात राहणार असल्याचेही आदेशात नमूद आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातीच अशीच परिस्थिती असून मागील काही वर्षांपासून चारा पिकांचा पेरा सातत्याने कमी होत आहे. यावर्षीही हीच परिस्थिती असल्याने चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ही बाब सध्या शेतकरी व पशुपालकांच्या चिंतेच्या विषय बनला आहे. त्यामुळे चारा विकत घेण्यासाठी पशुपालकांना धडपड करावी लागत आहे. त्यातच सोयाबीन व तुरीचे कुटार-चारा शहरी भागातील पशुपालक जास्त भाव देऊन खरेदी करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालक यांना चारा मिळत नाही व मिळाला तरी जास्त भाव देऊन खरेदी करावा लागत आहे. गावात चारा मिळत नाही. त्यामुळे बाहेर गावातून चारा घेऊन आणावा लागतो. चारा आणण्यासाठी भाडेही लागते. त्या कारणाने चाऱ्याचा भाव वाढत आहे.
चाऱ्यासाठी भटकंती
मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन व तूर या सारख्या पिकांचा पेरा कमी झाल्यामुळे चारा मिळत नाही व पर्यायाने ५०-१०० किलोमीटर असलेल्या गावात जाऊन चारा विकत आणावा लागत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पशुपालकांची स्थिती गंभीर झाली आहे, जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पुढे उन्हाळ्याचे दिवस सुरु होणार आहे. त्यावेळेस चाराटंचाईची समस्या भीषण होत आहे. मात्र यासाठी कमी खर्चात आणि अप्लवाढीत तयार होणाऱ्या चाऱ्याची निर्मिती शेतकऱ्यांनी करावी, तसेच यासाठी संबंधित कृषी विभागाची मदत घेऊन चार टंचाईवर मात करावी, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.