नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यात राब भाजणीची कामे सुरु आहेत. याच आदिवासी भागात बळीराजा खरीप पेरणीपूर्व मशागतीत गुंतला असून त्याचाच एक भाग म्हणजे राबभाजणी. राबभाजणी म्हणजे भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापुर्वी शेतातील निवडक जमीन भुसभुशीत करणे. सध्या याच कामांची लगबग ग्रामीण भागात सुरु असल्याचे चित्र आहे.
भात, नागली व वरई हे मुख्य पीक आहे. मागील वर्षी कमी प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते; मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. यासाठी शेती पूर्वमशागतीच्या कामांना तालुक्यातील विविध भागांत सुरुवात झाली आहे. यासाठी शेतामध्ये परंपरागत राब (आदर) केला जात आहे. म्हणजेच शेतातील पालापाचोळा, शेणखत, काट्याकुट्या त्यावर पानटे, गवत टाकून पेटवला जात आहे. असे केल्यामुळे शेतातील अनावश्यक तण नष्ट होऊन जमीन भाजली जाते आणि यामुळे पेरलेली रोपे ही तणमुक्त व लवकर उगवतात. भाताची पेरणी केल्यावर रोपात तण उगवून वाढू नये, हा त्यातील मुख्य हेतू असल्याचे शेतकरी सांगतात.
पीक घेण्यासाठी त्यापूर्वी पिकांच्या रोपाची लागवड करावी लागत असते, या रोपांच्या लागवडीसाठी शेतकरी भर उन्हात सुद्धा उन्हाची कसलीही पर्वा न करता, पावसाळ्यापूर्वी नागली, भात व वरई या पिकांसाठीच्या जमिनी तयार करण्यात मग्न असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्याचबरोबर शेताच्या बांधाची दुरुस्ती, पावसाळ्यात पडलेल्या शेताच्या नाल्याची दुरुस्ती याच महिन्यात केली जाते. शेतात शेणखत टाकण्याची कामे केली जात आहेत.
रोपाची लवकर वाढ..
राब (अदोर) भाजणी केल्यानंतर भाताचे व नागलीचे रोप पेरतो. त्या रोपाची लवकर वाढ होऊन लवकर लावणी करण्यासाठी येते. यामध्ये कमी प्रमाणात गवत उगवत असते, त्यामुळे लवकर लावणी होते तेव्हा आम्हाला पावसाळ्यापूर्वी ही कामे उन्हातान्हात करावी लागतात.- धनराज बोरसे, शेतकरी, हरणटेकडी, ता. सुरगाणा
राब भाजणीचे फायदे
आदिवासी शेतकर्यांचा खरीप हंगाम जून मध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल पासूनच सुरू होत असते. यासाठी उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारत असतो. शिवाय जमिन भूस भूसीत होते. अशा भाजणीच्या जागेवर भात व नागालीचे रोपे तयार केली जातात.