Agriculture News : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा (High Temperature) चांगलाच वाढला असून दुसरीकडे आदिवासी भागात राब भाजणीसाठी काडी कचरा गोळा करण्याची कामे सुरु झाली आहे. झाडाच्या फांद्या, पालापाचोळा, बारीक सारीक गोवऱ्या हे सर्व गोळा करून राब भाजणी (Rab Bhajni) केली जाते. ही राब भाजणी करण्यापूर्वी काय काय तयारी केली जाते? हे समजून घेऊयात....
राब भाजणी ही खरिपाची (Kharif Season) पूर्व तयारी असते. येथूनच खऱ्या अर्थाने खरिपाच्या कामांना सुरवात होत असते. तर भाजणीसाठी पहिली सुरवात ही झाडाच्या फांद्या तोडूनच करावी लागते. म्हणजे झाडांच्या फांद्या तोडून त्या योग्य पद्धतीने रचून ठेवल्या जातात. या रचून ठेवलेल्या कवळ्या एक किंवा दोन महिने तशाच पद्धतीने रचून ठेवतात, वाळण्यासाठी!
हेही वाचा : Agriculture News : पावसाळ्यात जनावरांच्या सोयीसाठी वैरणीची साठवणूक कशी केली जाते?
त्यानंतर वर्षभर गोळा केलेल्या गोवऱ्या एकत्रित आणण्याचे काम केले जाते. यासाठी बैलगाडीचा वापर केला जातो. ज्या राब भाजणी करायची आहे, अशा ठिकाणी गोवऱ्या झाडाच्या फांद्यासह इतर साहित्य आणून ठेवले जाते. सुरवातीला गोवऱ्यां पसरवल्या जातात. त्यानंतर त्यावर वाळलेले गवत पसरवले जाते. पुढे शेणखत आणि मातीचा पसारा केला जातो.
अशा पद्धतीने राब भाजण्यापूर्वी ही कामे केली जातात. ही सर्व कामे आटोपल्यानंतर राब भाजला जातो किंवा जाळला जातो. यावेळी देखील विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी आग लागण्याची शक्यता असते. म्हणूनच ज्या दिशेने वारं वाहत असेल तर मग त्याच्या उलट दिशेने दाढ पेटवावी लागते. याने आगीचा जास्त भडका होत नाही. राब पेटवून दिल्यानंतर हाती झाडाच्या फांद्या घेऊन उभे राहावे लागते. जेणेकरून आग लागलीच तर तात्काळ विझवता येईल. अशा पद्धतीने राब भाजणी केली जाते. यानंतर मग थेट पेरणीच्या कामांना सुरवात होते.
राब भाजणीचे प्रकार गवत, झाडपालाच्या कवळ्या वाळल्यानंतर साधारण मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये त्या नागलीच्या रोपासाठी जाळतात. त्या ज्या जागी जाळल्या जातात, त्या जागेला दाढ असे म्हणतात. तर झाडाचा पालापाचोळा जो वाळून खाली पडलेला असतो तो झाडतात त्याला पानट झाडणे असे म्हणतात. हे झाडलेले पानट भाताचे रोप तयार करण्यासाठी शेतात आणून जाळतात, त्याला आदोर असे म्हणतात. तर काट्याकुट्यांच्या जाळ्या जंगलातच तोडून तिथेच जाळतात, त्याला डाही असे म्हणतात ही डाही वरई किंवा मिरचीच्या रोपासाठी तयार केली जाते.
- तुकाराम चौधरी, प्रा. शिक्षक, आदिवासी संस्कृती अभ्यासक