Join us

Agriculture News : पावसाची ओढ, भात लागवड लांबणीवर, शेतकऱ्यांना दुबार पेरणीची धास्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:00 PM

नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात तरी चांगल्या पावसाची (Rain) अपेक्षा होती. मात्र सुरुवातीचे दोन दिवस सोडले ...

नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात तरी चांगल्या पावसाची (Rain) अपेक्षा होती. मात्र सुरुवातीचे दोन दिवस सोडले तर पुन्हा एकदा पावसाने दडी मारली असून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) भात लागवड लांबणीवर पडली आहे. भात रुपये देखील लागवड योग्य आली आहेत, मात्र पाऊसच नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ, सुरगाणा आदी भागात मोठ्या प्रमाणावर भात लागवड (Paddy Cultivation) केली जाते. मात्र पाऊसच नसल्याने ही भात लागवड लांबणीवर पडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या प्रारंभीच पाऊस ओढ देत असल्याने भात व नागलीची लावणी खोळंबली आहे. त्यामुळे यंदा खरीप उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय नागलीच्या लागवडीवर परिणाम होण्याची धास्ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जून महिन्यात अधून मधुन येणाऱ्या पावसाच्या सरींवर भाताची पेरणी करण्यात आली. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊसच झाला नाही. परिणामी जुलै महिना उजाडल्या 1 आणि 2 जुलै रोजी पावसाचे चांगले आगमन झाले. त्यामुळे शेतकरी आनंदी होता, मात्र हा आनंद केवळ दोनच दिवस राहिल्याने पुन्हा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता शेतकरी खाचरात पाणी साचण्याची वाट पाहत आहेत. नदी नाले विहिरी अद्यापही कोरड्या असून शेतकऱ्यांसह सर्वांनाच जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांना दुबार पेरणीची धास्ती 

नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदि तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख खरिपाची पिके घेतली जातात. या तालुक्यात भात लागवडीसाठी शेतकरी प्रचंड मेहनत घेत असतात. त्यामुळे यंदाही नेहमीप्रमाणे जूनमध्ये शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर भात पेरणी करून दिली. ऐनवेळी दुबार पेरणीचे संकट असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरलेले भात आजतागायत तग धरून आहे. मात्र आता पुन्हा पावसाने ओढ दिली असून पुढील काही दिवस ओढ दिल्यास पुन्हा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. 

टॅग्स :भातलागवड, मशागतपेरणीनाशिकशेती क्षेत्र