नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आदी मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामीण भागातील तसेच वंचितांसाठी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांचा आदर्श घेऊन मुक्त विद्यापीठ देखील तळागाळातील लोकांसाठी शिक्षण पोचविण्याचे काम करत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी केले, तर आभार कुलसचिव दिलीप भरड यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.