नाशिक : प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड (ration Card) धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Nashik Collector) सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई-केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्याचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एप्रिल २०२४ च्या पत्रांद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थीची ई- केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पडले होते.
शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थीने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडींग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई- केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांनादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातीलं स्वस्त धान्य - दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई- केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
प्रत्येक सदस्याची पडताळणी करा
स्वस्त धान्य दुकानात हैं- केवायसी प्रक्रिया निःशुल्क आहे. स्वस्त धान्य दुकानातील पौस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते. ई-केवायसी करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांना सुचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार दुकानदार आपल्या कार्डधारकांना याबाबतच्या सुचना देखील करीत आहेत. कार्डधारकांना केवायसी अपडेट करावे लागणार आहे. याबाबत दुकानदार देखील माहिती देणार आहेत.
- विशाल धुमाळ, पुरवठा निरीक्षक
१५ जूनपूर्वी पडताळणी करावी
१५ जूनपासून रेशन वाटप सुरू होणार आहे. त्यापूर्वी लाभाथ्यर्थ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानातून केवायसी पडताळणी करून घ्यावी. रेशन वाटप सुरू झाल्यानंतर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो. एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी शक्य होणार नाही, त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी १५ जूनपूर्वी पडताळणी करून घ्यावी. - सतीश भुतडा, अध्यक्ष, सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना.