Join us

Shenkhat Management : कच्चे शेणखत शेतात टाकू नये, कारण.... जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 2:13 PM

Agriculture News : त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील शेणखत हे पूर्णपणे कुजल्यावर शेतात टाकावे.

नाशिक  : कळवण तालुक्यातील (Kalwan) पिळकोस येथे पांढरी शिवारात कृषी विभाग, कळवण तसेच कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव (KVK Malegoan) यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे (Lashkari Ali) एकात्मिक कीड व्यवस्थापन व मार्गदर्शन मका उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले. तालुक्यातील गोळखाल, गोपालखडी, हिंगवे, मोहभणगी व पिळकोस या गावामध्ये जनजागृती  करण्यात आली.

यंदा खरीप हंगामातील मका पिकावर (Maize Crop) मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत असल्याने कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव येथील पीक संरक्षण विशेष तज्ज्ञ विशाल चौधरी, रुपेश खेडकर, कळवणचे उपविभागीय अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल रंधे, कृषी पर्यवेक्षक कांतीलाल पवार, कृषी सहायक प्रताप मोगरे यांच्या उपस्थितीत येथील शेतकरी साहेबराव आहेर यांच्या मका पीक क्षेत्रात कीड व्यवस्थापन व मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांच्या लाल कांदा, मका शेतात पिकांच्या मुळ्या खाणाऱ्या व्हाइट ग्रुप, हुमनी (कागळे) या कीटक अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील शेणखत हे पूर्णपणे कुजल्यावर शेतात टाकावे. कच्चे शेणखत शेतात टाकू नये. शेणखत व्यवस्थापन केल्यास शेतात दिसून येणाऱ्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही.- विशाल चौधरी, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव (शास्त्रज्ञ)

शेतकऱ्यांनी मका पिकात दिसून येणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास घाबरून न जाता कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी, तसेच तीस ते चाळीस दिवसांपर्यंत मका पिकाचे योग्य व्यवस्थापन करून लष्करी अळीचा प्रादुर्भाव पूर्णतः रोखता येतो.- विठ्ठल रंधे, मंडळ कृषी अधिकारी, कळवण

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रमकासेंद्रिय खतनाशिक