गोंदिया : पावसाळा येताच साप चावण्याचे प्रकारदेखील वाढतात. पावसाळा सुरू होताच काही सापांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो. तर मुसळधार पावसामुळे सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी जागेचा आडोसा शोधतात. सुरक्षित जागेच्या शोधात अनेकदा साप घरातील अडगळीच्या खोलीत किंवा घराजवळच्या एखाद्या ठिकाणी आसरा शोधतात. अशावेळी अनावधानाने आपण तिथे जातो आणि साप चावतो.
सर्पदंश झाल्यानंतर अनेकजण घाबरून जातात. गावाकडे अजूनही साप चावल्यानंतर एखाद्या बुवा- बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे विष उतरवण्यासाठी नेण्यात येते. मात्र, या प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो. साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिला आहे.
सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसा कराल...
सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच कितीतरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत हा उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो कसा कराल? सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम जमिनीवर झोपवावे. कारण जर तो व्यक्ती चालत-फिरत असेल तर विष शरीरात लवकर पसरते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरवू नका, त्याला हिंमत द्या. कारण घाबरल्यानंतर रक्त्तप्रवाह वाढतो. अशाने शरीरात विष लवकर पसरते. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे.
सर्पदंश झाल्यास हे करू नका
दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न नेता तत्काळ दवाखान्यात न्यावे, कोणाही मांत्रिकाकडे नेऊ नका. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला कडूलिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका. यामुळे तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवता. तसे करू नका. दंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ दवाखान्यात न्यावे. सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका किंवा कोणत्याही बिया वगैरे खाण्यास देऊ नका. रुग्णाला बेशुद्ध होऊ देऊ नका.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत...
जखमेच्या जागेवर दाताचे व्रण दिसतात.
जखमेतून रक्त येते.
चावा घेतलेल्या जागेवर किंवा अवयवावर सूज येते.
प्रभावित जागेच्या रंगात फरक दिसतो.
चक्कर येतात.
खूप घाम येतो.
हृदयाचे ठोके वाढतात.