नाशिक : जिल्ह्यात १७ ऑगस्टअखेर ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याने यंदाच्या खरीप हंगामाचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या मात्र पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. सोयाबीन पिकाची विक्रमी अशी सर्वाधिक १५२.८२ टक्के तर त्या खालोखाल मक्याची १२६ टक्के लागवड झाली आहे. पावसाअभावी जुलै महिन्यापर्यंत भाताची लागवड खोळंबली होती. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने भाताने तूट भरून काढली. १०७ टक्के क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुसळधार असा बरसला नसल्याने जिल्ह्यात भाताची लावणी संथ गतीने सुरू होती. पण, जुलैच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या आठवड्यात पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर व नाशिक या भात पिकासाठी अग्रेसर असलेल्या तालुक्यांत पावसाने जोर पकडला. त्यामुळे भात पिकाच्या लावणीनेही वेग घेतला. २९ जुलैअखेर भाताची शंभर टक्के लावणी आवश्यक होती. ती ७९.३२ टक्के झाली होती. पुढच्या आठ ते दहा दिवसात लागवड क्षेत्र १०७ टक्क्यांनी व्यापले. ९३ हजार ७८२ हेक्टरवर १६ ऑगस्टअखेर भाताची लागवड झाली आहे. आश्चर्य म्हणजे २९ जुलैअखेरच सोयाबीनची १३९ टक्के पेरणी झाली होती. ती नंतर १३ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा समाधान देणारा असल्याने दुष्काळ धुवून निघण्याची आशा आहे.
ज्वारी, बाजरी महागणार
यंदाच्या खरीप हंगामात ज्वारी अन् बाजरीचे लागवड क्षेत्र प्रचंड खालावले असल्याने निश्चितच ते महाग होईल. एकूण टक्केवारीपेक्षा ज्वारीची पेरणी केवळ २६.३४ टक्के झाली असून, बाजरीची लागवड केवळ ४९.५ टक्के झाली आहे. दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात मका, भात पिकानंतर ज्वारीची पेरणी झाली होती.
अनेक तालुक्यांमध्ये आता हवा पाऊसदोन आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने चिंतेचे ढग वाढत आहेत. जोमदार वाढत असलेल्या पिकांना एखाद्या दमदार पावसाची गरज आहे. त्यात गरम होईल अशी उष्णता वाढल्याने शेतजमीन अधिक कोरडी होत आहे. पिकांना पावसाची गरज आहे. येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, सिन्नर तालुक्यांत पावसाची अधिक गरज आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेली पेरणी
नाशिक जिल्ह्यात भात पिकाची 93782.47 हेक्टरवर लागवड झाले आहे त्यानंतर अनुक्रमे ज्वारी 619 हेक्टर, बाजरी 54483.5 हेक्टर, नाचणी 15674.9 हेक्टर, मका 275068.7 हेक्टर, इतर तृणधान्य 11645 हेक्टर, इतर कडधान्य 824.7 हेक्टर, तुर 3953 हेक्टर, मूग 20002 हेक्टर, उडीद 4028.39 हेक्टर, भुईमूग 16729.9 हेक्टर, कापूस 36,257 हेक्टर अशी लागवड झाली आहे.