Join us

68 हजार पोत्यांच उद्दिष्ट, ग्रामसभांकडून तेंदूपत्ता संकलनासाठी काय दर ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 3:16 PM

शेतीची कामे संपल्यानंतर कमी दिवसांत अधिक पैसे देणारा रोजगार म्हणून तेंदूपत्ता हंगामाकडे पाहिले जाते.

चंद्रपूर : मुख्य वनसंरक्षक कार्यालय अंतर्गत वनविभागातील एकूण ६७ पैकी ६४ युनिट लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ चार युनिट लिलाव शिल्लक आहेत. पुढील आठवड्यात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. वनविभागाने यंदा ६८ हजार ४५० पोते (स्टॅन्डर्ड) संकलनाचे उद्दिष्ट पुढे ठेवले. सीएफआर प्राप्त ग्रामसभाही स्वतःच्या तेंदूपत्ता फड्या सुरू करणार आहेत.

शेतीची कामे संपल्यानंतर कमी दिवसांत अधिक पैसे देणारा रोजगार म्हणून तेंदूपत्ता हंगामाकडे पाहिले जाते. जिल्ह्यात अद्याप तेंदूपत्ता संकलन कामाला सुरुवात झाली नाही. तेंदूपत्ता तोडणी कामातून कमावलेल्या पैशातून हजारो कुटुंब पावसाळ्यातील उदरनिर्वाहाची गरज भागवित असतात; पण अजूनही तेंदू फळी अद्याप सुरू न झाल्याने सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. साधारणतः दरवर्षी मे महिन्यात तेंदूपत्ता संकलन कामास सुरुवात होते. मुख्य वनसंरक्षक कार्यालय अंतर्गत लिलाव प्रक्रियेतील चार राऊंड पूर्ण झाले. चार राऊंडमध्ये ६७ पैकी ६४ युनिटचे लिलाव आटोपले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू होऊ शकतो.

मुख्य वनसंरक्षकांनी घेतली खबरदारी

मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी यंदा वन परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन लोकसभा निवड- णुकीची आचारसंहिता लागण्या- पूर्वीच तेंदूपत्ता युनिट लिलावाची प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेला कंत्राटदारांचाही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अडचण आली नाही. केवळ चार युनिटचे लिलाव शिल्लक आहेत. लिलाव झालेल्या युनिटची संख्या अधिक असल्याने नागरिकांना रोजगार देणारा तेंदूपत्ता हंगाम मोठा आधार ठरू शकतो.

१७ ग्रामसभाही तेंदूपत्ता संकलनास सज्ज

चंद्रपूर वनहक्क कायद्यांतर्गत वनहक्क प्राप्त ग्रामसभांना गावच्या सीमांतर्गत व सीमेबाहेर वनउपज गोळा करण्याचा अधिकार आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अशा १७ ग्रामसभांचे लिलाव पूर्ण झाले. तेंदूपत्ता संकलनासाठी सभा सज्ज झाल्या. यावेळी ग्रामसभांकडून शेकडा ४५० रुपये एवढा दर जाहीर करून तेंदूपत्ता संकलन केले जाणार आहे. 

लिलावात सहभागी होण्यासाठी वनहक्क प्राप्त ब्रह्मपुरी तालुक्यातील १७ ग्रामसभांनी महासंघ स्थापन करण्यात आला. लोकांना वनहक्कांचे महत्त्व कळल्याने ग्रामसभांचे लिलाव पारदर्शीपणे पूर्ण झाले. यंदा ग्रामसभांनी तेंदूपत्ता संकलनाला चांगला दरही दिला आहे. हवामान पूरक राहिल्यास जिल्ह्यात येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ग्रामसभांना सहकार्य करावे. -सधाकर महाडोरे. सचिव अक्षयसेवा संस्था, मेंडकी

तेंदूपत्ता संकलन उद्दिष्ट

तसेच विभागनिहाय तेंदूपत्ता संकलन उद्दिष्ट ठरलेले असून यात चंद्रपूर १७ हजार ५००, ब्रम्हपुरी २६ हजार ४००, मध्य चांदा २४ हजार ५५० असा एकूण ६८ हजार ४५० इतका आहे. तसेच आतापर्यंत लिलाव न झालेले युनिट यामध्ये चंद्रपूर वनविभागात १, ब्रह्मपुरीत २ व मध्य चांदा विभागात १ अशा एकूण ४ तेंदूपत्ता युनिटचा लिलाव शिल्लक आहे. 

टॅग्स :शेतीचंद्रपूरशेतकरीगडचिरोली