Join us

ऊसतोड, बिबट्याचे दर्शन अन् कामगारांची सुरक्षा

By गोकुळ पवार | Published: December 26, 2023 2:41 PM

उसतोडीमुळे बिबट्याचे दर्शन होत असल्याने ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात ऊसतोड सुरु असून नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला, चांदोरी परिसरात ऊसतोड सुरु आहे. मात्र उसतोडीमुळे बिबट्याचे दर्शन होत असल्याने ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. या दिवसांत बिबटे पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडत असल्याने अनेकदा ऊसतोड करतांना बछडे आणि रात्रीच्या सुमारास बिबटे आढळून येत असल्याने ऊसतोड कामगारांची सुरक्षा गंभीर मुद्दा बनला आहे. 

हिवाळ्यात सर्वदूर गुलाबी थंडीची चाहूल असताना याच काळात ऊसतोड आणि बिबटे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे साहजिकच मानव बिबट्या संघर्ष पुढे येतो. सद्यस्थितीत नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह निफाड, सिन्नर, येवला भागात ऊसतोडीचे काम सुरु आहे. अशावेळी शेतात दबा धरून बसलेला बिबट्या नजरेस पडतो. यातून काहीवेळा ऊसतोड कामगार यांच्यावर हल्ला देखील होण्याचा संभव असतो. त्यामुळे ऊसतोड कामगारांची सुरक्षा यामुळे ऐरणीवर आली आहे. याबाबतीत संबंधित यंत्रणा हात वर करून देत असल्याचे चित्र आहे. 

एकीकडे आगस्ट महिन्यात मुकादमाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांना उचल देऊन करार केला जातो. त्यानंतर ऑक्टोबर नोंव्हेबर महिन्यात ऊसतोड कामगार मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी शेतावर येत असतात. अशावेळी ऊसतोड कामगार आपल्या लहान मुलांना घेऊन ऊसतोड करत असतात. लहान मुलं आजूबाजूला उसाच्या सरीत बसलेले असतात. ऊसतोड सुरु असताना अचानक बिबट्या नजरेस पडतो आणि सर्वांचीच धांदल उडते. याचवेळी ऊसतोड कामगार स्वतःचा जीव वाचवू कि मुलांना बघू या अवस्थेत पळ काढतो. ऊसतोड कामगार जीव मुठीत घेऊन पळ काढतात. काहीवेळा गावकरी आणि आजूबाजूला असलेल्या कामगाराच्या मुळे जीव वाचतो. या सगळ्या घडामोडीत ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. 

शेतकरी म्हणतात की,... 

शेतकरी तुषार खरात म्हणाले की, सद्यस्थितीत ऊसतोड सुरु आहे. बिबट्याच्या संचार गृहीत धरून काळजी घेतली जात आहे. ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी शेतकरी स्वतः शेतात उभे राहत आहेत. काही वेळा अनेक शेतकऱ्यांच्या गटच किंवा घरातील इतर सदस्य देखील उपस्थित राहत आहेत. मात्र ऊसतोड सुरु असल्याने बिबट्या नजरेस पडतो आहे. त्यामुळे शेतकरी आधीच वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पिंजरा लावणेबाबत कायदेशीर बाब असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

वनविभागाचे अधिकारी म्हणतात... 

याबाबत निफाडचे आरएफओ अक्षय मेहेत्रे म्हणाले की, वनविभागाकडून याबाबत जनजागृती सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड सुरु आहे. अशा ठिकाणी जाऊन जनजागृती केली जात आहे. बिबट्या नजरेस पडल्यानंतर काय काळजी घ्यावी? काय करावं याबाबत सांगितले जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून पिंजरा लावण्याची मागणी केली जाते. मात्र पिंजरा लावण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्यावा लागत असल्याचे स्पष्टीकरण मेहेत्रे यांनी दिले. एकूणच ऊसतोड कामगार मात्र यात भरडला जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह शेतावर दाखल होतो. कोणत्याही सुरक्षेविना तो उसतोडीचे काम करत असतो. मात्र ज्यांच्यावर ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असते, तेच हात वर करत असल्याने कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसतंय.

टॅग्स :नाशिकशेतीबिबट्या