SRT Technology :नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पेठ, सुरगाणा, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यात भातशेती (Paddy Crop) मोठ्या प्रमाणात केली जाते. यात पारंपरिक भात लागवडीला अनेक शेतकरी प्राधान्य देतात. मात्र काही वर्षांपासून लागवडीसाठी चार सूत्री आणि एसआरटी पद्धतीचा अवलंब होताना दिसत आहे. भात लागवडीसाठी (Rice Cultivation) एसआरटी पद्धत का अवलंबविली जाते.? किंवा एसआरटी पद्धत काय आहे हे समजून घेऊया...
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील (Peth Taluka) आदिवासी बळीराजाने खरिपाच्या मशागतीची कामे पूर्ण करून राब (भाजणी) केलेल्या जागेवर अथवा ज्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्या ठिकाणी भात व नागली रोपासाठी बियाण्यांची पेरणी केली आहे. यावर्षी सगुणा राईस तंत्र (एसआरटी) वापराने लागवड क्षेत्र वाढणार असून, पारंपरिक भात लागवडीच्या मेहनतीतून बळी राजाची सुटका होणार आहे.
एसआरटी पद्धत काय आहे?
‘एसआरटी’ लागवड पद्धतीत नांगरणी, चिखलणी आणि लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचतोच पण उत्पन्नही वाढण्यास मदत होते. ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीचा कर्ब वाढतो आणि उत्पादकताही वाढते. भात कापणीनंतर इतर पिकेही घेतली जाऊ शकतात. यामुळे शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नही वाढते. रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर येऊ शकतो. भात आठ ते दहा दिवस आधी तयार होतो.
एक हजार हेक्टर
यंदा सगुणा राईस तंत्र पद्धतीचा अवलंब करत भात लागवड करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. तालुक्यात किमान एक हजार हेक्टर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भात लागवड केली जाईल. यामुळे पारंपरिक पद्धतीने भात लागवडीचे क्षेत्र यंदा घटणार आहे. एसआरटी पद्धतीने भात लागवड केल्यास लागवडीचा खर्च कमी येतो. पेठ तालुक्यात भात, नागली, वरई, खुरसणी आदी पिके घेतली जात असली तरी दिवसेंदिवस भात क्षेत्रात वाढ होत असून, नागलीचे क्षेत्र घटत चालले आहे. आदिवासी भागातील शेती खूपच कष्टमय असून, पावसावर अवलंबून असल्याने नागलीसाठी टप्प्याटप्प्याने पावसाची गरज भासते. त्यामुळे भात शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
एसआरटी तंत्रानुसार लागवड करावीआदिवासी शेतकऱ्यांची भात लागवड पद्धत ही खूप मेहनतीची आहे. चिखल तुडवून गाळ करून त्यात भात रोपांची लागवड करणे, हे अंत्यत खर्चीक असून मोठ्या प्रमाणात मजुरांची मजुरी चुकवावी लागते. परिणामी, उत्पन्न वाढीची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सगुणा राईस तंत्राचा (एसआरटी) वापर करून भात लागवड करावी.-अविनाश खैरनार, तालुका कृषी अधिकारी, पेठ