Join us

शेतकऱ्यांचे गाडगेबाबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:59 AM

शेतीत कष्ट करा, उपाशी राहा, पण कर्ज काढू नका, ही संत गाडगेबाबांची शिकवण आजही तंतोतंत लागू होते.

महाराष्ट्रातील थोर संत, किर्तनकार, समाजसुधारक, स्वच्छतेचे पाईक म्हणून संत गाडगेबाबांना ओळखले जाते. स्वच्छता आणि शिक्षणाबरोबरच गाडगेबाबांनी शेतकरी आणि शेतीसाठी मोलाचा मंत्र दिला. आपल्या गुरा वासरांना जपा, शेतीत कष्ट करा, उपाशी राहा पण कर्ज काढू नका, ही गाडगेबाबांची शिकवण आजही तंतोतंत लागू होते. संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने संत गाडगेबाबांचे शेतकऱ्यांविषयीचे विचार समजून घेऊयात. 

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी, परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. याचं स्वच्छतेबरोबर शेतकऱ्यांचे गाडगेबाबा म्हणूनही त्यांना ओळखले जातं असतं. त्यावेळी शेतकऱ्यांना सावकारी जाचातून सोडविण्यासाठी शेतकरी कर्जमुक्त चळवळ' गाडगेबाबांनी उभी केली होती. अनेक शेतकरी सावकारी जाचामुळे भरडून निघाले होते. अशा शेतकऱ्यांना आधार देऊन इतरांना कर्ज न घेण्याचा सल्ला, त्यावेळी गाडगेबाबांनी दिला. 

ज्यावेळी मामाच्या घरी संत गाडगेबाबा होते. त्यावेळी कर्जापायी मामा घरातील बैल विक्री करणार होते. त्यावेळी गाडगेबाबा यांनी बैल विकायला विरोध केला, “बैल विकाल, तर उद्यापासून मी औताला जाणार नाही. मला घरात ठेवा; नाही तर हाकलून द्या. कुठेही चार घरं भीक मागून पोट भरेन; पण असा कसाईखाना मला परवडणार नाही. बैल विकू देणार नाही,” अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली. मात्र, मामाच्या उरावर सावकारी कर्ज होते. घरात पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना बैल सांभाळणे परवडणारे नव्हते. मात्र बैल विकायचा निर्णय गाडगेबाबांनी थांबवत सावकारविरुद्ध बंड पुकारले. त्याचबरोबर याच सावकाराने  मामाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडगेबाबांनी स्वतः सावकाराशी दोन हात करत मामाला जमीन परत मिळवून दिली होती. 

गाय सुखी, तर शेतकरी सुखी 

संत गाडगेबाबांनी शेतीसोबत जनावरांना जीव लावला. जनावरांसाठी पाणपोया निर्माण करीत असताना गोरक्षणाची एक प्रचंड मोठी चळवळ उभी केली. गाय शेतीला बेल देते आणि बैल असल्यामुळेच शेतीची कामे करण्यास सोपे होते. त्यामुळे गाडगेबाबांनी गाय-बैलांना जतन करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. शेती व्यवस्था टिकली पाहिजे म्हणून उभी केलेली गोरक्षण ही क्रांतिकारी चळवळ होती. शेतकरी वर्ग आर्थिक धोरणात कमकुवत आहे, याचे भान त्यांना होते. 'गाय सुखी, तर शेतकरी सुखी, शेतकरी सुखी, तर जग सुखी', म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा, हीच शिकवण गाडगेबाबा नेहमी देत असतं. 

उपाशी राहा पण कर्ज काढू नका...

त्याकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर सावकारी जाचामुळे भरडला जात असे. अनेकांच्या जमिनी सावकाराकडे गहाण असत सावकाराकडून घेतलेल्या कर्जामुळे शेतकरी डबघाईला जात असत. त्यामुळे घरची शेती असून सावकाराकडे मजुरीसाठी जावं लागत असत. त्यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छता आणि शिक्षणासह ते आपल्या कीर्तनात सावकारी कर्जाचा नेहमी उल्लेख करत असत. 'उपाशी राहा पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नका', असा सल्ला ते नेहमी शेतकऱ्यांना देत असतं. 'कर्ज काढून सण साजरे करू नका, कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका', उपाशी राहा पण कर्ज काढू नका, सावकाराच्या जाळ्यात अडकू नका, असा सबुरीचा सल्ला गाडगेबाबा देत असत. कारण गाडगेबाबांनी हे अनुभवलं होत. मामाच्या गावी असताना मामावर सावकारी कर्ज असल्याने त्यांनी घरचा बैल विकायला काढला होता, या विरोध गाडगेबाबांनी केला होता. 

पशुहत्या बंदीची चळवळ

संत गाडगेबाबा यांनी त्यावेळी पशुहत्या बंदीची चळवळ महाराष्ट्रभर उभी केली. त्याकाळी मोठ्या प्रमाणावर यात्रा-जत्रा गावोगावी भरत असत. या यात्रा जत्रांमध्ये पशूंचा बळी दिला जात असे, मात्र गाडगेबाबांनी गावोगावातील यात्रा जत्रांमध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली, पशुहत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्रभर पशुहत्या बंदी चळवळ राहून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. अनेकदा लग्नामध्ये अवाजवी खर्च केला जात असे. त्यावेळी गाडगेबाबांनी लग्नासारख्या परंपरांवर अधिक खर्च करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग सांगितला. स्वतः च्या दोन मुली अन् एक मुलगा यांचे विवाह अत्यंत कमी खर्चात केले. या लग्नात जनावरांच्या चाऱ्याची त्यांनी सोय कली.

टॅग्स :शेतीशेतकरी