Join us

Sarki Dhep Rate : दहा वर्षात सरकी ढेपेच्या दरात काय बदल झाला? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 21:03 IST

Sarki Dhep Rate : पिकांचे नुकसान, बाजारात योग्य भाव नाही. यातच सरकीची ढेपेचे (Sarki Dhep Rate) भाव गगणाला भिडले आहेत.

नंदुरबार : शासनाच्या धोरणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी व पशुपालक मोठ्या संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, बाजारात योग्य भाव नाही. यातच सरकी ढेपेचे (Sarki Dhep Rate) भाव गगणाला भिडले आहेत. मागील दहा वर्षात सरकी ढेपेच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.  

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याच्या दरात दिवसागणिक वाढ (Rate Increased) होताना दिसत आहे. शेतीत लागणाऱ्या खताच्या किमतीत गेल्या दहा वर्षांत ५५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर पशुखाद्याचे दर गगणाला भिडले आहेत. तीन वर्षांत सोयाबीनचे भाव दोन हजारांनी गडगडले आहेत. तर कपाशीला सात हजाराचा टप्पा ओलांडत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पिके घ्यायची म्हटले तर रासायनिक खत शिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. 

मागील दहा वर्षांच्या काळात खताची 'डीएपी' ची बॅग ८५० वरून १४०० रुपयांवर येऊन ठेपली आहे. तर सरकी ढेप १ हजार ८०० रूपयांवरून २ हजार २०० रूपये मोजून विकत घ्यावी लागत आहे. पिकांचे भाव सातत्याने घसरतच आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरताना दिसत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आता समोरील काळात शेती करायची कशी?, आणि दुधाळ जणावरांचा सांभाळ करायचा कसा? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने दुधाळ जनावरांसाठी असलेल्या पशुखाद्याचे दर वधारले आहेत. शेतीमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. परंतु, त्यामानाने कापसाच्या सरकीपासून तयार झालेल्या पशुखाद्याचे दर दिवसागणिक वाढत चालले आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा.  - भरत माळी, शेतकरी,

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेती