नाशिक :रेल्वेस्थानकातील पार्सल विभागात स्कॅनिंग मशीन लावून रेल्वेने प्रत्येक डागामागे पाच रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केल्याने शेतकरी व व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. स्फोटक पदार्थ अथवा इतर कुठलीही धोकेदायक वस्तूची रेल्वे मार्फत वाहतूक होऊ नये, म्हणून पार्सल विभागात रेल्वे प्रशासनाकडून स्कॅनर मशीन लावण्यात आले आहे.
नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागातून दररोज सरासरी एक हजार डाग रेल्वेमार्फत देशभरात रवाना होतात. एक किलोचे खोके असो व अन्य कितीही वजनाचे खोके असो, प्रत्येकामागे पाच रुपये शुल्क रेल्वे प्रशासनाकडून आकारण्यात येत आहे. पार्सलमधून विस्फोटके, ज्वालाग्राही पदार्थ अन्य इतर धोकादायक वस्तूची वाहतूक होऊ नये. प्रवासी व रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये या हेतूने रेल्वे बोर्डाच्या धोरणानुसार हे स्कॅनर मशीन लावण्यात आले असून या एक फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.
नाशिक, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. रेल्वे पार्सलमधून कोणी विस्फोटके अथवा इतर धोकेदायक वस्तू पाठवू नये, या कारणास्तव स्कॅनिंग मशिन बसविल्याने व्यापारी व एजंटाना भुर्दड बसत आहे. मात्र, स्कॅनिंग मशिनची किंमत काही दिवसातच वसूल होईल, एवढा महसूल रेल्वेला नाशिकरोडमधून मिळतो. मात्र स्कॅनर मशिनची रक्कम वसूल झाल्यानंतर देखील ते टेंडर पद्धतीने देण्यात आल्याने सुरु ठेऊन लूट होणार असल्याची तक्रार शेतकरी, कार्टिंग एजन्ट यांनी केली आहे.
स्कॅनिंग शुल्क रद्द करण्याची मागणी
दरम्यान स्कॅनर लावताना काटिंग एजन्ट, व्यापारी, शेतकरी यांना रेल्वेने विश्वासात घेतले नाही. रेल्वे डीआरएम इती पांडे यांना स्कॅनिंग मशीन शुल्क बंद करण्याची मागणी केली आहे. स्कॅनिंग शुल्क पूर्ण रद्द केले नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू असा इशारा काटिंग एजन्ट कमलेश मोगल, शिवशंकर आडसुरे, संतोष पाटील, नितीन गरुड, मंगेश रोकडे, दीपक उन्हवणे, शेतकरी बाळासाहेब डावरे, विलास दळवी, युवराज कारभारी भोर आदींनी दिला आहे.