गोंदिया : यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील बहुतांश भागातील तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. अशा वातावरणात उष्णतेच्या लाटेने आजारी पडल्यावर पुरेसे उपचार व काळजी न घेतल्यास ते जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जोरदार जाणवू लागला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे सुरु होत आहेत. मात्र कडक उन्हामुळे शेती कामाचे वेळापत्रक बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पारा वाढत आहे. मार्च अखेरीस ३९ अंशांवर असलेला पारा आता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चाळीस अंशांच्या आसपास आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जनजीवनावर झाला असून विशेषतः शेतीच्या मशागतीच्या कामावर जाणवत आहे.
ग्रामीण भागात शेतकामे शांत असल्याचे चित्र वाढत्या उन्हामुळे शेतकरी सकाळी ११ वाजेपूर्वीच शेतातील कामे आटोपून दुपारी आराम करीत आहेत. तर सायंकाळी साडेचार ते पाच वाजेनंतर पुन्हा शेतात कामाला सुरुवात करीत आहेत. उन्हामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून डॉक्टरांचा सल्ला घेऊन अनेक जण घरात आराम करीत आहेत. दुपारी ग्रामीण भागात शेतकामे शांत असल्याचे चित्र आहे.
काय घ्याल काळजी?उष्ण वातावरणात होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत तहान लागलेली नसली, तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत.बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकून घ्यावा.३ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम यामुळे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना सावलीत ठेवावे. त्यांना पिण्यास पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा.
या बाबी टाळाव्यात...लहान मुले किवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक- घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.