नाशिक : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमिहीन विधवा व परित्यक्त्या यांना प्रति लाभार्थी 04 एकर कोरडवाहू व 02 एकर ओलीताखालील जमीन 100 अनुदान या प्रमाणे शासन अटी व शर्ती नुसार जमीन वाटप करण्याची योजना आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून (Social welfare) राज्यातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती (Scheduled caste) व नवबौद्ध घटकातील कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana) राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शासनास आपली शेतजमीन विक्रीसाठी इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
योजनेचे स्वरूप :
जमिनीच्या दरातील वाढ लक्षात घेता, या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना देण्यासाठी जिरायत जमिनीकरिता प्रति एकर रूपये 5 लाख तर बागयती जमिनीकरिता प्रति एकर रूपये 8 लाख इतक्या कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्याबाबत 14 ऑगस्ट 2018 च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देशित केले आहे. या योजनेंतर्गत उपलब्ध होणारी जमीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान तत्वावर 4 एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन उपलब्ध करून दिली जाते. या योजनेंतर्गत खरेदी करावयाची जमीन कसण्यास योग्य असावी, जमीन डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपाड नसावी.
इथं साधा संपर्क
विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, बी विंग, 2 रा मजला, नासर्डी पुल नाशिक कार्यालयात सुटीचे दिवस वगळून उपलब्ध करून घेता येतील. या अर्जासोबत 7/12 उतारा, 8 अ उतारा व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडील मुल्यांकन पत्रक इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वरील पत्यावर किंवा 0253-2975800 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.