वाशिम : बीज प्रक्रिया केल्याने (Seed Treatment) बियाण्यांमध्ये सुप्तावस्थेत असलेली कीड नष्ट होण्यासह पिकांवरील रोगावर प्राथमिक टप्प्यातच नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. बियाण्यावर प्रथम रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशकाची प्रक्रिया करावी व अर्ध्या तासानंतर जैविक खत, जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.
बीजप्रक्रिया म्हणजे काय? अन्नद्रव्य उपलब्धतेत वाढ करणे, पिकांवरील कीड व रोगांना प्रतिबंध करण्यासाठी जैविक खत, जैविक बुरशीनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशकांच्या बियाण्यावर करण्यात येणाद्या प्रक्रियेस बीजप्रक्रिया असे संबोधले जाते.
बीजप्रक्रियेचे असे आहेत फायदे ! खरीप हंगामातील पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होऊन पेरणी सुलभ होते. बियाण्यांभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होण्यासह बियाण्याची उगवणशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते. उत्पादित मालाचा दर्जा वाढून त्यास चांगला दर मिळतो.
बीज प्रक्रियेदरम्यान काळजी घेणे आवश्यक! बीजप्रक्रिया करताना हॅन्डग्लोयन किया पॉलिथिन पिशवी हाताला गुंडाळून घ्यावी. १ लिटर पाण्यात १०० ग्रॅम गूळ टाकून पाणी गरम करावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याचा बियाण्यावर केवळ शिडकावा करावा. कृषि विभागाच्या शिफारशीनुसार पुढील प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया करावी.
उत्पादन खर्चात २५ टक्के घट रीतसर प्रक्रिया करून पेरणीसाठी घरगुती बियाण्यांचा वापर केल्याने गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वाचवले. उत्पादन खर्चात सुमारे २५ टक्के घट आली. सोयाबीनची वाढही अपाट्याने होऊन उत्पन्नात वाढ आली.
नापिकी पासून बचाव आणि दर्जेदार शेतमाल उत्पादनासाठी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. बीजप्रक्रियेमुळे अंकुरण्यापासून काढणीपर्यंत पिकांचे किडी व रोगांपासून संरक्षण होते. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी