मंगेश व्यवहारे
नागपूर : नागपूर शहरात तापमान (Nagpur Temperature) 43 वर पोहोचले आहे. घराबाहेरच नाही तर घरातही राहणे असह्य झाले आहे. घरातील कूलर, एसीतूनही गरम वाफा मारायला लागल्या आहे. घरात राहूनही घामाच्या धारांनी नागपूरकर हैराण झाले आहेत. उन्हामुळे जगणे असह्य झालेल्या नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी आहे. उत्तर नागपुरातील प्रकाश गोविंदवार यांच्या ग्रीन नेट शेड मंगल मंडप या संकल्पनेतून घरातील तापमान १५ डिग्रीपर्यंत कमी होण्यास मदत झाली आहे. त्यांनी या संकल्पनेला क्लायमेट कूलर (Climate Coller) असेही संबोधले आहे.
नागपूर शहराचे आज सिमेंटीकरण झाले आहे. सिमेंट फार लवकर गरम होते आणि थंड व्हायला ८ ते १० तास लागतात. त्यामुळेच रात्रीही आपल्याला गर्मी जाणवते. ग्रीन नेट शेड मंगल मंडप या संकल्पनेतून घराचे तापमान कमी होण्यास मदत होते. पाचपावली पुलाला लागून असलेल्या प्रवीण अभंगे यांच्या घराच्या छतावर ही संकल्पना साकारण्यात आली आहे. भर दुपारी ४३ डिग्री तापमानात त्यांच्या घराच्या छतावर गेले. त्यांच्या छतावर उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव आला.
दरम्यान त्यांनी ६०० चौरस फुटांच्या छतावर लोखंडी शेड तयार केले. त्या शेडला ग्रीन नेट बांधली आणि छतावर टेरेस गार्डन तयार केले. यात फुलांची, फळांची झाडे लावली. त्याचा परिणाम त्यांच्या घरामध्ये दिसून आला. पूर्वी उन्हाळ्यात कूलर लाहूनही घरात गरम व्हायचे. आता कूलरही गार वारा द्यायला लागला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत एक फॅन सुरू असेल तर तापमान जाणवत नसल्याचे प्रवीण अभंगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रकाश गोविंदवार यांच्या मार्गदर्शनातून ही संकल्पना साकारली आहे, त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येतोय.
- घरातील तापमान नियंत्रित राहते
हा क्लायमॅट कूलर घरातील वॉटर कूलरसारखेच काम करतो. छतावर लावलेल्या ग्रीन नेटमुळे सूर्याची थेट किरणं छतावर पडत नाहीत आणि तापमानच अर्ध्यावर येते. शिवाय छतावर सावली पसरत असल्याने छत गरमच होत नाही. त्यात टेरेस गार्डनमध्ये लावलेले वृक्ष तापमान कमी करते. शिवाय वातावरणातील कार्बनही शोषून घेते. त्यामुळे छत गरम होत नाही. घरातील तापमान नियंत्रित राहते, असे गोविंदवार म्हणाले.
ग्रीनपॅच वाढविण्यास होऊ शकते मदत
शहरात आजच्या घडीला ५ टक्केच ग्रीनरी शिल्लक राहिली आहे. उद्याने आणि घरातील झाडे सोडल्यास रस्ते उजाड झाले आहे. बांधकामामुळे अख्खे शहर सिमेंटचे झाले आहे. त्यामुळेच ४० वर तापमान गेले की ऊन सहन होत नाही; पण शहरातील प्रत्येक इमारतीच्या टेरेसवर ग्रीन नेट शेड व टेरेस गार्डन ही संकल्पना साकारल्यास शहरात मोठा ग्रीन पॅच निर्माण होण्यास मदत होऊ शकते. परिणामी वातावरणातील प्रदूषणाला आळा घालता येऊ शकतो.
- प्रकाश गोविंदवार, ग्लोबल वार्मिंग आणि जलवायू परिवर्तनाचे अभ्यासक