नाशिक : देवळा (Deola Taluka) तालुक्यातील निबोळा, विठेवाडी, झिरेपिंपळ येथील शेतकऱ्यांची कोबी बियाण्यात फसवणूक (Cabbage Bogus Seed) झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित बियाणे कंपनीने याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी विभागाने सात कोबी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे केले असून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे प्रतिएकरी साडेतीन ते चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील विजय निकम, संजय निकम, ललित निकम यांच्या शेतात तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या बियाण्याची शेतात टोकण पद्धतीने लागवड केली होती; परंतु इतक्या कालावधीनंतरही कोबीचे गड्डे तयार झाले नाहीत. विजय निकम यांनी साडेतीन एकर क्षेत्रांवर लाखो रुपये खर्च करून कोबीची लागवड केली होती. मात्र, कोबीचे पीक न आल्याने आणि सध्या कोबीला २० ते २५ रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेल्या दुसऱ्या जातीच्या कोबीचे भरघोस उत्पादन मिळाले आहे.
दरम्यान बियाण्यात फसवणूक झालेल्या या सर्व शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल करून पंचनामा करण्यासाठी अर्ज केला. त्याची दखल घेऊन कळवणचे विभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी पाखरे, नलिनी खैरणार, शास्त्रज्ञ पवन चौधरी, कंपनीचे अधिकारी समाधान मगर आदींनी प्रत्यक्ष सात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ५ हेक्टर क्षेत्राचा पंचनामा केला. शेतातील कोबी पिकाचे ९५ टक्के नुकसान झाले असून ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
साडेतीन एकर क्षेत्रांत लाखो रुपये खर्चुन १०० पिशव्यांचे रोपे तयार करून लावले होते; परंतु लावलेल्या साडेतीन एकरमध्ये रुपयाचेही उत्पन्न मिळाले नाही, संबंधित कंपनीने झालेली नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
- संजय निकम, विठेवाडी.
शेतकऱ्यांनी अतिशय महागडे बियाणे वापरून लाखो रुपये खर्च करून, मेहनत करून उत्पादन घ्यावयाचे आणि दोन-तीन महिन्यांनंतर ते वांझोटे निपजायचे, बोगस कंपन्यांच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपनीकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना