Join us

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना आहे तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 4:51 PM

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येत असून या योजेनच्या माध्यमातून अनेक बाबी पुरविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. यात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टीचा योजनांद्वारे पूरवठा करण्यात येतो. शासनाच्या माध्यमातून नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येत असून या योजेनच्या माध्यमातून अनेक बाबी पुरविण्यात येत आहेत. यात शेडनेटचा देखील समावेश असून आतापर्यत अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती, तंत्रज्ञानाची कास धरून शेती करावी, यासाठी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत अनुदान तत्त्वावर शेडनेट दिले जात होते. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील १४०० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत शेडनेट उभारले. त्यांना शासनाने पाच वर्षांत तब्बल १९६ कोटी ५२ लाख रु. अनुदान दिल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. परिणामी, शेतकरी त्रस्त असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेडनेट, पॉली हाउस उभारून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, यासाठी शासनाचा आग्रह आहे.

कसं मिळतंय अनुदान 

शेडनेट आणि पॉली हाउस उभारण्यासाठी शासनाकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना यासह अन्य योजना आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेडनेट आणि पॉली हाउस उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. पोकरा योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेडने उभारण्यासाठी ७५ टक्के तर बहुभूधारके शेतकऱ्यांना ६५ टक्के अनुदान देण्यात येते. तर अन्य योजनांमध्ये प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देण्यात येते. शेडनेटच्या साईजवरून अनुदानाचे दर निश्चित करण्यात आले होते. सर्वात लहान दहा गुंठ्यांवरील शेडनेटसाठी साडेतीन लाख रुपये तर सर्वांत मोठ्या एक एकरवरील शेडनेटसाठी तब्बल १८ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. पॉली हाउस उभारण्यासाठी शासनाकडून ४५ लाख रुपयांपर्यंत अनुदान शेतक-यांना दिले जाते. 

पॉली हाउस उभारण्याकडे शेतकऱ्यांची पाठ

पॉली हाउसमध्ये शेती करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. यासाठी शेतकयांना पॉली हाउस तंत्रज्ञान अवगत असावे, पॉली हाउसमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांवर बाहेरील हवामानाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. शेतकरी पिकाला हवे तसे तापमान पॉली हाउसमध्ये ठेवू शकतात. पॉली हाउसमधील शेतीमालाला चांगला दर मिळतो. असे असूनही शेतकरी पॉली हाउस उभारत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात केवळ २५ शेतकयांनीच पॉली हाउस उभारल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीशेतकरीफलोत्पादन