Join us

Shindi Palm Tree : सिंदीचे झाडं कसं बनले कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 5:01 PM

Shindi Palm Tree : सिंदीच्या झाडांच्या फांद्यापासून झाडू, खराटे तयार करून त्याची गावागावात फिरून विक्री करतात.

Shindi Palm tree : सिंदीचे झाड झाले (Shindi Palm Tree) त्यांच्या जगण्याचा आधार, हे शिर्षक वाचून आपणही विचार कराल, की हे कसे शक्य आहे. पण होय, हे शक्य आहे. अनेकजण आजही सिंदीच्या झाडांच्या फांद्यापासून झाडू, खराटे तयार करून त्याची गावागावात फिरून विक्री करतात. यातूनच मिळणाऱ्या पैशावर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या अनेक वर्षापासून हा व्यवसाय करीत असून, सिंदीचे झाडच आता त्यांच्या जगण्याचा आधार झाला आहे. 

आजही समाजातील अनेक घटक भटकंती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. हा समाज आजही शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीवन आले आहे. यातील काहीजण जिवावर खेळून कर्तबगारी दाखवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. तर काहीजण मिळेल ते काम करून, नाहीतर भिक्षा मागून गुजराण करत आहेत. गोंदिया (Gondiya) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, बोपाबोडी, सुंदरी आदी गावात गोपाळ समाज वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे स्वतःची शेती नाही. काहींना पक्की घरे नाहीत. बकऱ्या चराई करणे, सिंदीच्या फांद्यापासून झाडू तयार करून विक्री करणे, हाच त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. 

... यावरच चालतो उदरनिर्वाह

जीवनाचा गाडा पुढे नेण्यासाठी कुणाच्या नशिबी कोणते काम येईल, हे सांगता येत नाही. वडेगाव येथील गोपाळ समाजातील गोपीचंद वाघाडेला सिंदीच्या झाडाच्या फांद्याच जीवन जगण्याचे बळ देत आहेत. गोपीचंद कुटुंबासह गावोगावी भटकंती करीत होता. अशातच मागील २० वर्षांपासून सडक अर्जुनी ज- वळील वडेगाव येथे कुटुंबासह राहू लागला. त्याच्या एका मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगा, एक मुलगी व पत्नी आहे. मुले मोठी झाल्यामुळे त्याला खेळ दाखविणे शक्य होत नाही. त्यामुळे तो सिंदीच्या फांद्यावरच जीवन जगत आहे. सिंदीच्या झाडाच्या फांद्या आणून त्यापासून झाडू तयार करून त्याची विक्री करतो.

पूर्वी कुटुंबासह विविध ठिकाणी खेळ दाखवून, भटकंती करीत असताना वडेगाव येथेच स्थायी झालो. मुले मोठी झाल्याने खेळ दाखविणे जमत नाही. त्यामुळे फळे, झाडू तयार करून त्याची विक्री करून उदरनिर्वाह करतो. सततच्या स्थित्यतरांमुळे शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समाजासाठी विकासाचा सूर्य अद्याप उगवलेला नाही. शासनाकडून या समाजाला आजही अनेक सवलती मिळत नाहीत. यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित आहे. - गोपीचंद वाघाडे, वडेगाव.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रगोंदियासिंधुदुर्ग