- विजेंद्र मेश्राम
Paddy Farming : गोंदिया जिल्हा (Gondiya District) हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर खरिपात धानाची लागवड होते. धान शेतीच या भागातील शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत आहे. सध्या खरीप हंगामातील रोवणीचा हंगाम सुरू आहे. बरेचदा यादरम्यान मजुरी, नांगरणी आणि शेतीच्या इतर कामाचे दर शेतकऱ्यांमधील स्पर्धेमुळे वाढविले जातात. याचा फटका अनेक लहान-मोठ्या शेतकऱ्यांना बसतो. पण, ही परिस्थिती आपल्या गावात निर्माण होऊ नये म्हणून गोंदिया तालुक्यातील बिरसी या गावाने यंदा अनोखा निर्णय घेतला. रोवणीसाठी (Paddy Sowing) मजुरी व इतर कामांसाठी एकच दर ठरविला. यापेक्षा कमी किंवा अधिक दर देऊ नये, असा निर्णय ग्रामसभेने घेतला. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, गावकऱ्यांनी सुद्धा याचे स्वागत केले आहे.
पावसाचे बिघडलेले तारतंत्र पाहता अनेक शेतकरी थोडा फार पाऊस झाला की सिंचन सोय उपलब्ध असल्याने लवकर रोवणीची कामे आटोपून घेत आहे. बरेचदा एकाच वेळी रोवणीला सुरुवात झाल्याने मजुरांची टंचाई आणि नांगरणीसाठी ट्रॅक्टरसुद्धा मिळत नाही. अशात काही शेतकरी मजुरीचे दर वाढवितात. तर, ट्रॅक्टरमालक सुद्धा संधीचा फायदा घेऊन दुप्पट दर आकारतात. याचा फटका मात्र लहान आणि बरेचदा मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा बसतो. आधीच वाढलेला शेतीचा लागवड खर्च आणि त्यातच अशा परिस्थितीमुळे शेती करणे अलीकडे घाट्याचा सौदा झाला आहे.
मात्र, आपल्या गावातील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये यासाठी गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील गावाने ग्रामपंचायतीच्या मदतीने यंदा रोवणीसाठी एकच दर निश्चित केला आहे. हा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मान्य करण्यात आला. गावकऱ्यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले. तसेच याची अंमलबजावणी केली. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली. असा निर्णय घेऊन गावकऱ्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला असून, एक आदर्शसुद्धा इतर गावांसमोर ठेवला आहे.
असे आहेत गावकऱ्यांचे निर्णयरोवणीसाठी महिलांची मजुरी १५० रुपये, जेवणाची १ ताससुटी, उशिरा आल्यास प्रति तास २० रुपये मजुरी कमी.पुरुषांसाठी मजुरीचे दर ३०० रुपये, जेवणाची १ तास सुटी,उशिरा आल्यास प्रति तास ४० रुपये कमीट्रॅक्टरने नांगरणी करणे प्रती तास ७०० रुपये, रोटरी १ हजार रुपये, पट्टा मारणे ७०० रुपये प्रति एकरगावात रोवणी सुरू असताना कुणी मजूर इतर गावात रोवणीसाठी जाणार नाही,जो मजुरी अथवा ट्रॅक्टरचे दर वाढवेल, त्याच्यावर १ हजार रुपये दंड आकारला जाईल.
तर ग्रामपंचायकडून दाखले नाहीगावातील शेतकऱ्यांच्या हितार्थ हा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या संमतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्याला ग्रामपंचायतकडून कुठलेच दाखले अथवा शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असा निर्णय गावकऱ्यांच्या सहमतीने घेतला आहे.