भंडारा : लग्नसराई आटोपताच मे महिन्याच्या मध्यापासून खरीप हंगामाच्या कामांना प्रारंभ होणार आहे. सध्या शेतकरी रब्बीची व उन्हाळी कामे निपटविण्यात व्यस्त आहेत. खरीप हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहे.
ही सर्व खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे हिताचे ठरणारे आहे. खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना गाफील राहिल्यास फसवणूक होऊ शकते. बियाणे, खत व रासायनिक खत खरेदीवेळी कुणी व्यावसायिक बिल देण्यास टाळाटाळ करत असल्यास त्याची माहिती कृषी विभागाला द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीला प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशक खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर शेतकरी व विक्रेत्याची स्वाक्षरी आणि मोबाइल क्रमांकाची नोंद करून घ्यावी, पीक निघेपर्यंत पावती सांभाळून पावती व ठेवावी.
खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सीलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी. एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करू नयेत. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी.
कृषी अधिकाऱ्यांकडे वेळीच करा तक्रार
शेतकऱ्यांनी आपल्या कृषी निविष्ठांशी संबंधित तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे नोंदवाव्यात. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागामार्फत तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या पथकाकडून त्या तक्रारीची दखल घेतली जाते. आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खत व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. यातून फसवणूक टाळता येते. कुठलीही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. तक्रारीची दखल घेत दोषर्षीवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सामूहिक कृषी निविष्ठा खरेदीला द्या प्राधान्य
शेतकऱ्यांनी शक्यतो कृषी निविष्ठांच्या वैयक्तिक खरेदीपेक्षा गटामार्फत सामूहिक कृषी निविष्ठांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे. जेणेकरून कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही. गटामार्फत सामूहिक खरेदी केल्याने वाहतूक खर्चात बचत होईल. शिवाय वेळही वाचेल. सोबतच दरामध्येही सुट मिळण्याची शक्यता असते.
- संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.