भंडारा : दिवसेंदिवस रासायनिक खतांचा (fertilizer) वारेमाप वापर वाढल्याने जमिनीची पोत घसरत चालली आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी मातीपरीक्षण करणे आवश्यक असते. ज्यामुळे पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी महत्वाचे ठरते. शिवाय जमिनीचे आरोग्य पोषक ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी दर तीन वर्षानंतर एकदा मातीपरीक्षण (Soil testing) करणे आवश्यक आहे. तेव्हाच जमिनीचा पोत टिकून राहतो, मातीपरीक्षांबद्दल नेमकं समजून घेऊया...
माती परीक्षण जमिनीच्या आरोग्यासाठी महत्वाचा घटक आहे. शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके आदींचा मोठ्या प्रमाणावर तर सेंद्रीय (Organic farming) खते, शेणखते, हिरवळीची खते आदींचा वापर कमी प्रमाणात करतात. त्यामुळे शेती नापीक बनत आहे. जमिनीचा पोत खालावत असल्याने पिकेसुद्धा जोमाने वाढत नसल्याचा शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे.मात्र अनेक जण शेतजमिनीच्या माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीत कोणत्या घटक द्रव्यांची कमतरता आहे, याबाबत माहिती मिळते. एकूणच जमिनीचे आरोग्य जाणून घेता येते. त्यानुसार आपणाला उत्पादन घेणे सोयीचे होत असते.
किती दिवसांत मिळतो तपासणी अहवाल?
मातीपरीक्षण केल्यानंतर एका महिन्यात नियमानुसार अहवाल मिळतो. जवळच्या कृषी सहायका- मार्फत माती परीक्षण अहवाल पोहचता करता येतो. शेतकऱ्यांना स्वतः परीक्षणाचा अहवाल संबंधित विभागाच्या कार्यालयातून प्राप्त करता येतो.
मातीपरीक्षण कसे करावे?
शेतजमिनीतून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे म्हणजेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नमुना काढावा, म्हणजेच माती गोळा करून ती परीक्षणाला पाठवावी. विशेषः झाडांखालील मातीचा नमुना काढू नये.
मातीपरीक्षण कशासाठी?
आपल्या शेतजमिनीत कोणते गुण व दोष आहेत. जमिनीला कोणत्या घटक द्रव्यांची आवश्यकता आहे किंवा पिकानुसार शेतकऱ्याला कोणत्या खतांचा वापर करावा लागेल, या सर्व बाबी जाणून घेण्याकरिता मातीपरीक्षण करावे लागते.
रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग वाढली आहे. परंतु, शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मातीपरीक्षण करणे हिताचे ठरणारे आहे. यामुळे शेतीचे आरोग्य कळण्यास शेतकऱ्यांना मदत होते. त्यामुळे भरघोष पिकांसाठी शेतकऱ्यांनी मातीचा नमुना काढून मातीपरीक्षण करून घ्यावे.
- वृषाली देशमुख, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, भंडारा.
हेही वाचा : Rabbi Pik Vima : आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर