नाशिक : महावितरणच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत (Suryaghar Yojna) नाशिक मंडळ परिमंडळात आतापर्यंत ८ हजार ३६१ वीजग्राहकांनी त्यांच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती (Solar Energy) प्रकल्प बसविले असून, त्यातून २९.८२ मेगावेंट वीजनिर्मिती होत आहे. तर याच योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या परिमंडळातील १९ हजार ७७१ ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्याचे काम सुरू असून, आगामी काळात यातून अंदाजे ७०.५१ मेगावॅट ऊर्जानिर्मिती होईल, अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविणान्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते.
महावितरणने नुकताच या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे परिमंडळात लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नाशिक परिमंडळात एकूण १९ हजार ७७१ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे. यात नाशिक मंडळात ७ हजार ९६५ ग्राहक असून मालेगाव मंडळात २ हजार ६७२ ग्राहक आहेत.
तर अहिल्यानगर मंडळात ९ हजार १३४ ग्राहकांनी सूर्यघर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेली आहे. लवकरच या ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून त्यामाध्यमातून भविष्यात ७०.५१ मेगावॅट ऊर्जानिर्मिती होइल, अशी माहिती महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी दिली. लवकरच या योजनेचा प्रकाश परिमंडळात वाढेल.
तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी महावितरणने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. परिमंडळातील जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा.
- विकास आढे, माहिती व जनसंपर्क अधिकारी, नाशिक