- रविंद्र शिऊरकर कुटुंबाचे विभाजन झाले, पिढ्यांचे विस्तार झाले की एका शेताचे अनेक तुकडे अर्थात भाग केले जातात. मात्र हे भाग अबाधित रहावे, म्हणून त्यांना कुंपण केले जाते, ज्याला बांध म्हणतात. म्हणजेच चारही बाजूने असलेली १-२ फूट रुंद पडीक जागा. शेतीला कुंपण म्हणून बांध असतात, मात्र मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर राज्यातील विविध न्यायालयात बरेच प्रकरणे ही या बांधांच्या वादांवर आहेत. ही कित्येक वर्षे पडून आहे, ज्यात निकाली निघणारे प्रकरणे अल्प प्रमाणात असतात.
एरवी या बांधावर विविध तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि यावर उपाय योजना करतांना दोन्ही बाजूकडील कोणत्याच शेतकरी बऱ्याचदा सरसावत नाही, त्याचे कारण म्हणजे याच बांधांवरून पेटलेले वाद, पण या बांधांचा सुयोग्य वापर करून शेतकरी एक चांगली बचत किंबहुना विविध कंपन्यांच्या विमा (एकरकमी परतावा) बचत सारखी मदत यातून मिळवू शकतो.
या बांधावर सागवान, नारळ, आंबा, महोगुनी, बांबू, चंदन, जांभूळ, आदी विविध झाडांची लागवड केली तर त्या बांधांचे संरक्षण देखील होते. सोबत सागवान, महोगुनी, चंदन आदी झाडांच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना सामायिक काही वर्षांनंतर बचत ठेवी सारखी एक चांगली रक्कम याद्वारे मिळू शकते. ज्यामुळे बांध शेती करण्याकडे देखील शेतकऱ्यांनी लक्ष देणे काळाची गरज असून या द्वारे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
शेतीच्या बांधावरून दररोज कित्येक ठिकाणी वाद होतात. बऱ्याचदा हे वाद टोकाला जाऊन त्यातून जीवितहानी देखील होते. मात्र यावर उपाय म्हणून बांधावर विविध फळझाडांची लागवड केली तर शेतकऱ्यांना हंगामात फळे मिळतील, त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच त्यासोबत त्यांना आर्थिक फायदा होईल व याबरोबरच बांधांचे संगोपन करण्याची समस्या हि मिटेल.- अशोक आढाव, उपविभागीय तालुका कृषी अधिकारी वैजापूर गंगापूर (छत्रपती संभाजीनगर)