चंद्रपूर : जे पिकवले जाते त्याला भाव नाही आणि जे विकलं जातं त्याचे उत्पादन घेतले जात नाही. अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पाहिजे तसा भाव नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ज्वारीचा पेरा घटला असतानाच ज्वारीचा भाव मात्र तेजीत आहे.
पूर्वी भाकरीला गरिबीची किनार होती. आता ज्वारीने गव्हाला मागे टाकल्याने तिची श्रीमंती वाढली आहे. या संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांनीही ज्वारीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. मागणी वाढल्यामुळे ज्वारीला चांगला भाव मिळत असल्याने पुढील हंगामात शेतकरी ज्वारीच्या पेऱ्याकडे वळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उच्च प्रतीची ज्वारी प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजार हजार रुपये, तर गव्हाला अडीच ते तीन हजार रुपये एवढाच दर मिळत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारी अधिक महत्त्वाची आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पेरा घटला
चंद्रपूर जिल्ह्यात धानासोबतच पूर्वी ज्वारी, मका पीक घेतल्या जात होते. अतिशय कमी खर्चात ज्वारीचे उत्पादन होते. मात्र भाय मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी बंद केली. काही मोजकेच शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. दरम्यान, आता ज्वारीचे उत्पादन घेतले तरी चिमण्या, पाखरांचांचा तसेच रखवालीचाही मोठा त्रास शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे शेतकरी ज्वारी पेरणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
कमी खर्चात उत्पादनाची संधी
ज्वारीचे पीक प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते. या पिकाला पाणी व खताची अतिशय कमी प्रमाणात गरज पडते. त्यामुळे जिल्ह्यात काही वर्षापूर्वी या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. मात्र कालांतराने या पिकाची जागा इतर पिकांनी घेतली. आता भाव वाढल्याने कमी खर्चात उत्पादनाची संधी शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.
आहारात प्राधान्य
वैद्यकीय क्षेत्रातून ज्वारी आरोग्यासाठी चांगली असल्याचे सांगण्यात येते. ज्वारीला गव्हापेक्षा आहारात प्राधान्य मिळत आहे. भाकरी रोज खाणाऱ्यांची संख्याही वाढली. परिणी मागणी वाढली असून उत्पादन कमी आहे. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीचे दर सध्या अधिक आहे. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय बद्धकोष्ठ, मूळव्याध, अपचन, वजन वाढणे, अशा व्याधींपासून सुटका मिळावी, यासाठी डॉक्टरांकडून ज्वारीची भाकरी आहारात घेण्याचा सल्ला दिला जातो.