Join us

नाशिक जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला! दर चांगला मिळणार का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 1:35 PM

कमी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे उत्पादन ७० टक्के पूर्ण झाले नाही,मात्र ज्वारीचा पेरा प्रचंड वाढला आहे.

नाशिक : कमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा कांद्याचे उत्पादन ७० टक्के पूर्ण झाले नाही. ज्वारीचा पेरा मात्र प्रचंड वाढला आहे. रब्बी हंगामात ४०६५ हेक्टरचे उद्दिष्ट असताना विक्रमी ३३०५ हेक्टरवर लागवड वाढली असून, १७९ टक्के पेरा झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे; मात्र असे असतानाही बाजारात ज्वारीचा भाव वाढलेलाच आहे. सिन्नर लालुक्यात सर्वाधिक ४३३१ हेक्टरवर ज्वारीची लागवड  झाली आहे.

मागील वर्षी पेरणी क्षेत्र कमी झाल्याने बाजारात ज्वारीचे भाव वाढले होते. त्यामुळे बाजारातील ज्वारीचे वाढते भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाऐवजी रब्बी ज्वारी पेरणीला पसंती दिली. परिणामी, यंदा रब्बी हंगामात अपेक्षित क्षेत्रापेक्षा अधिक ज्वारीची पेरणी झाली. बाजारात मिळत नसलेले अपेक्षित दर, वन्यप्राण्यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान आदी कारणांमुळे शेतकरी ज्वारीच्या पेरणीबाबत उदासीन होते. आता ज्वारीला होत असलेली मागणी आणि जलसाठा पाहून शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरणीवर भर दिला आहे.

चांगल्या दराची अपेक्षा

बाजारात ज्वारी २५०० ते २८०० हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. शेतकऱ्यांच्या ज्वारीलाही बाजार समितीमध्ये चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा वाढला आहे. हल्ली जवळपास प्रत्येक घरात मधुमेह रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह तज्ञ पोळीऐवजी ज्वारीची भाकरी खाण्यास सांगत आहेत. एकूण उत्तम आरोग्यासाठी ज्वारी खूप लाभदायक असल्याने बाजारात ज्वारीची मागणी वेगाने वाढली आहे.

९० टक्के पेरा वाढला

गतवर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांनी ज्वारीचा पेरा वाढला आहे. रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी कमी झाली होती. त्या तुलनेत यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. बाजार समित्यांमध्ये ज्वारी खरेदी केंद्र वाढविण्यात येणार आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा ज्वारी लावली. मात्र, इतका पेरा झाला आहे की, त्यामुळे भाव कमी व्हायला नको, अन्यथा परिश्रम वाया जातील. पेरा वाढला की लोकांना भाव कमी होईल, ही आशा असते; परंतु मधल्या साखळीमुळे आम्हालाही भाव मिळेलच असे नाही. - निवृत्ती पाटील, शेतकरी

कोणत्या तालुक्यात किती पेरा

मालेगाव तालुक्यात 287 हेक्टर, बागलाण तालुक्यात 44.5 हेक्टर, कळवण तालुक्यात 136 हेक्टर, नांदगाव तालुक्यात 1121 हेक्टर, सुरगाणा तालुक्यात 112 हेक्टर, नाशिक तालुक्यात 11.8 हेक्टर, दिंडोरी तालुक्यात 235 हेक्टर, इगतपुरी तालुक्यात एक हेक्टर, निफाड तालुक्यात एक हेक्टर, सिन्नर तालुक्यात सर्वाधिक 4 हजार 331 हेक्टर, येवला तालुक्यात 580 हेक्टर, चांदवड तालुक्यात 446 हेक्टर अशी एकूण 7 305 हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे आणि लवकरच ज्वारी काढण्याला देखील सुरुवात होणार आहे

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीज्वारीमार्केट यार्डपीक व्यवस्थापन