गडचिरोली : खरिपाच्या धानाचा हंगाम (Paddy Harvesting) आटोपला की, रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करतात. सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून फेकीव पद्धतीने पेरणी केली जात आहे. पशुधन घटल्याने ट्रॅक्टरने नांगरणी (Rabbi Season) होते. यात अनेकदा अति खोलवर गेलेले बियाणे उगवत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाची पेरणी विशेषतः बैलजोडीने करावी, असे आवाहन आरमोरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
धान पट्टयात खरिपाच्या धानाची कापणी झाली की, काही शेतकरी रब्बीच्या पिकासाठी (Rabbi Crop Sowing) नांगरणी करतात. या हंगामात उडीद, मूग, हरभरा, गहू, मोट (मटकी), मसूर, वाटाणा, पोपटवाल आदी पिकांची लागवड करतात. या हंगामात नांगरणीसाठी जमिनीत ओलावा मिळत नसेल तर ट्रॅक्टरची नांगरणी योग्य राहील; पण ओलाव्यामुळे जमिनीची ट्रॅक्टरने नांगरणी योग्य होत नसेल तर दोन दिवस थांबून बैल जोडीने नांगरणी करणे योग्य ठरेल. शेतकरी ट्रॅक्टर नांगरणीचा एक तास देऊन जमिनीत बियाणे टाकून पुन्हा दुबार नांगरणी करतात.
अशावेळी बरेच बियाणे जमिनीच्या आतमध्ये जातात. अति खोलवर गेलेले बियाणे उगवत नाहीत, बैल जोडीच्या हलक्या पावलाने उगवण क्षमतेवर परिणाम होत नाही. या वर्षातील चांगल्या पर्जन्यामुळे शेतजमीन रब्बी पिकाला अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, गहू, तृणधान्य पिके, सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी या तेलवर्गीय पिकाचे उत्पादन घ्यावे. शेतकऱ्यांनी निरोगी बिजाची लागवड करावी, यासाठी आरमोरी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने रब्बी हंगाम बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे.
पेरीव पद्धत अतिशय चांगली
ट्रॅक्टरद्वारे पेरणी यंत्राने किंवा नांगराद्वारे पेरणी नळकांड्यांने पेरणी केल्यास बियाणे ओलाव्यापर्यंत उतरतात. यामुळे ते १०० टक्के उगवतात. ही पद्धत पेरणीसाठी अतिशय चांगली आहे. शेतकरी ह्या पद्धतीचाही वापर करू शकतात. अनेकदा अति खोलवर गेलेले बियाणे उगवत नाहीत. शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाची पेरणी विशेषतः बैलजोडीने करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रब्बीतही आता धान, मका पिकाचे क्षेत्र वाढल्याने भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, जवस, मोहरी या वेलवर्गीय पिकाचे उत्पन्न घटले आहे. बाजारात दिवसेंदिवस तेलाच्या किमती वाढल्या म्हणून शेतकऱ्यांनी कमी खर्चाच्या व जास्त नफ्याच्या तेलवर्गीय कडधान्य पिकाचे उत्पन्न घ्यावे.
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी
हेही वाचा :