Soyabean Production : हवामानाचे फिरलेले उलटे चक्र आणि कीड रोगांचा जबरदस्त प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन (Soyabean Market) उत्पादकांचे कंबरडेच मोडले. भरमसाठ उत्पादन खर्चामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकऱ्यांनी आता सोयाबीन कापणी व मळणीच्या कामासाठी लगबग सुरू केली आहे. मळणी आटोपल्यानंतर सोयाबीनच्या (Soyabean Production) उत्पादनात कमालीची घसरण दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक अस्मानी संकटात सापडला असून, बाजारभावही योग्य मिळेना, अशी दुहेरी पंचाईत उभी ठाकली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात सोयाबीन व कपाशी (cotton Crop) या दोन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कापूस पिकाचेही बेहाल आहे. कपाशीची योग्य वाढ न झाल्याने आणि विविध कीड रोगांनी वेढल्याने कपाशीच्या उत्पादनात फारसा चमत्कार होणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. त्यातच दुसरीकडे सोयाबीन फुलांवर, कापणीवर आले असताना अनेकदा संततधार आणि मुसळधार पाऊस बरसला. शेतात कसेबसे उभ्या असलेल्या पिकांच्या सभोवताल पाणीच पाणी साचल्याने शेंगा झाडावरच सडल्या.
अनेक शेतांमधील सोयाबीनच्या शेंगाना 'बुरशी' लागल्याचा प्रकारही बघावयास मिळाला. पावसामुळे सोयाबीन पीकही चिखलात लोळले. मधल्या कालखंडात मुळकूज, खोडमाशी आदी कीड रोगांनी सोयाबीनला उद्ध्वस्त केले. पावसामुळे अनेकांना केरकचरा आणि झाडांची निगा राखणे, फवारणी करणेही कठीण झाले होते. या संपूर्ण निसर्गाच्या असमतोलपणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बारीक अन् सडका दाणा
सोयाबीनची कशीबशी मळणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मळणीचा खर्चही परवडणारा नाही. सोयाबीनचा दाणा बारीक, तर काहीअंशी सडका निघत असल्याने शेतकरी कमालीचे चिताग्रस्त झाले आहेत. शिवाय, असंख्य शेतकऱ्यांना यलो मोझेंक व्हायरसने सळो की पळो करून सोडले होते. वारंवार उद्भवणाऱ्या संकटामुळे सलग नुकसान झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर प्रचंड परिणाम झाल्याचे चित्र आहे.
उतारी किती आला?
'लोकमत'ने विविध गावांमधील शेतकऱ्यांशी चर्चा केली. सोयाबीनची उतारा किती आली, असा प्रश्न विचारताच अनेक शेतकऱ्यांनी डोक्यावरच हात ठेवला. यंदाच्या वर्षात पावसाने पीक गिळंकृत केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. एकरी तीन पोते उत्पादन झाल्याची बाब संजय झाडे यांनी सांगितली. राहुल शेरकी, नीलेश ठाकरे यांच्याकडे कसबसे एकरी चार पोते उत्पादन झाले. बहुतांश खराब निघाल्याचीही चिता त्यांनी व्यक्त केली.